दारणा नदीच्या पुलाखाली औषधांचा बेवारस साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:35 AM2019-06-25T00:35:33+5:302019-06-25T00:36:15+5:30
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देवळाली कॅम्प : भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी रात्री दारणा नदीवरील पुलालगत कोणीतरी अज्ञाताने तीनशे-चारशे औषधांच्या बाटल्या आणून टाकल्या आहेत. अनेकदा याच ठिकाणी वापरलेल्या वस्तू, सडलेली फळे, बांधकाम तोडून डेब्रीज टाकण्यात येते. यामुळे डम्पिंगची जागा निर्माण झाल्यासारखे वाटते. याठिकाणी कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नदी पुलाजवळ टाकलेली औषधे कोणी टाकली याबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी रहिवासी श्याम ढगे, मंगेश सांगळे, बाळासाहेब पानसरे, सुभाष ठुबे, सचिन करंजकर, नारायण करंजकर आदींनी केली आहे.
विशेष म्हणजे याच ठिकाणी पुलालगत दोन्ही बाजूला असलेली जमीन धसली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी साचलेली घाण नदीपात्रात मिसळली जाते आणि तेच नदीपात्रातील पाणी पुढे नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठ्यास जाते. यामुळे अनेकांना पाण्याच्या माध्यमातून त्रास होऊ शकतो.