प्रमुख रस्त्यांसह शहरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:19+5:302021-04-26T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे शहरात रविवारी (दि.२५) प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. वैद्यकीय कारणांसाठी अथवा विलगीकरणातील रुग्णांना अत्यावश्यक वस्तू पुरविणाऱ्यांव्यतिरिक्त शहरात अन्य कोणीही फिरताना दिसून आले नाही. त्यामुळे शासनाच्या निर्बंधांना नाशिककरांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसी दंडुका आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीने सलग सातव्या विकेंडलाही नाशिककरांनी घरातच राहून शासनाच्या कडक निर्बंधांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आठवडाभरात १५ टक्के नियमांनुसार, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडणारा कर्मचारीही रविवारी घरातच थांबल्याने शहरातील विविध रस्त्यांसह मुख्य बाजारपेठांमध्येही अपवाद वगळता शुकशुकाट पहायला मिळाला.
कोरोनामुळे सलग पाचव्या शनिवारीही नाशिककर घरातच थांबले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह, उपनगरे आणि रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. गत आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विकेंडला वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. शहरात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना आवश्यक बेड, ऑक्सिजन व रेमडेसिविर यासारखी औषधे उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी कोरोनाचा धसका घेत घराबाहेर पडणे टाळले. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शासनाने लागू केलेले कडक निर्बंध लागू केले असून, या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीसही रस्त्यावर असल्याने पोलिसी दंडुक्याची भीती आणि तापमानाचा वाढलेला पारा यामुळे नाशिककरांनी घरातच बसणे पसंत केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची पोलिसांकडून आणखी काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत असल्याने शहरातील मुख्य रस्तेही रविवारी ओस पडले होते. दरम्यान, काही नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून बाहेर पडताना दिसले. मात्र, यात वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात भाजीपाला आणि फळ विक्रेते रस्त्यावर असले तरी त्यांना तासनतास ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.
मुख्य रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट
नेहमीच ग्राहकांची वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेतील रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार ,शरणपूर रोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड परिसरात रविवारी शुकशुकाट होता. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर या भागातील गर्दीवर नियंत्रण आले असून, रविवारी सर्वत्र शांतता दिसत होती.
===Photopath===
250421\25nsk_28_25042021_13.jpg~250421\25nsk_29_25042021_13.jpg~250421\25nsk_30_25042021_13.jpg
===Caption===
शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट~शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट~शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट