आठवड्यात एक ‘ड्राय डे’

By admin | Published: November 30, 2015 11:54 PM2015-11-30T23:54:33+5:302015-11-30T23:55:09+5:30

पाणीपुरवठा राहणार बंद : पाच तासांच्या चर्चेनंतर महासभेचा निर्णय, दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी

A 'Dry Day' Week | आठवड्यात एक ‘ड्राय डे’

आठवड्यात एक ‘ड्राय डे’

Next

नाशिक : राज्य शासनाच्या जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षणात कपात केल्याने उद्भवलेल्या जलसंकटाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी बोलविलेल्या विशेष महासभेत शहरात दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा कायम ठेवत डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पाणीवापराबाबत नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचेही यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जाहीर केले. सुमारे पाच तास चाललेल्या चर्चेत भाजपा वगळता सर्व सदस्यांनी अंगात काळे डगले घालत शासनाचा आणि पालकमंत्र्यांचाही निषेध नोंदविला.
मागील आठवड्यात २३ नोव्हेंबरला मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी महापालिकेसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अद्याप या निर्णयाचे लेखी आदेश महापालिकेकडे प्राप्त झालेले नाहीत. मात्र, महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात झाल्याने येत्या काळात उद्भवणाऱ्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पाणी नियोजन आणि उपाययोजनांसंबंधी विशेष महासभा बोलाविली होती. यावेळी सुमारे ४० नगरसेवकांनी पाणी नियोजनासंबंधी उपाययोजना सुचवितानाच भविष्यात पुन्हा पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता शासनाकडे दादही मागण्याचे ठरविण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी सध्याची एकवेळ पाणीकपात सुरू ठेवली तरी शहराला ८८ दिवस पाणी कमी पडणार असल्याची वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली, तर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बाष्पीभवनामुळे होणारे पाणी वगळून शासनाने पाण्याचे आरक्षण केल्याचे आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, शासनाने महापालिकेवर कृत्रिम पाणीटंचाई लादली आहे. उपलब्ध पाणीसाठा कमी पडणार असल्याने शहरातील विहिरी अधिग्रहित करण्यात याव्यात, जुन्या विहिरींची स्वच्छता करण्यात यावी, टॅँकरची संख्या वाढवावी, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल्स करावेत, सद्यस्थितीतील बोअरवेल्सवर जलपऱ्या बसविण्यात याव्यात, बांधकामांसाठी लागणारे पाणी त्वरित बंद करावे, प्रत्येक उद्यानात बोअरवेल्स करावेत, गंगापूर धरणातील गाळ काढण्यात यावा, किकवी धरणासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, जुन्या पाइपलाइन बदलण्यात येऊन पाणी गळती रोखावी, अशा सूचना करण्यात आल्या.

Web Title: A 'Dry Day' Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.