धरण उशाशी कोरड घशाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:16 PM2018-04-07T12:16:18+5:302018-04-07T12:16:18+5:30
गंगापूर परिसर : गिरणारे जवळील इंदिरानगर गाळूंशी गावातील लोकांची पाण्यासाठी भटकंती
नाशिक- तालुक्यातील इंदिरानगर गाळूंशीच्या ग्रामस्थांना कश्यपीसारख्या धरणाचा शेजार असूनही पाण्याविना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाण्याबरोबरच इतरही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रासले आहेत. ग्रामपंचायतीत म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप पंचायतीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य, पाणी ,वीज ,अश्या अनेक समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
डोंगरावर वसलेल्या इंदिरानगर गाळूंशी गावाच्या पायथ्याशीच कश्यपी धरण असूनही गाव तहानलेले आहे.
गिरणारे पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हे ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव धोंडेगाव पासून सण २०१६ मध्ये विभक्त होऊन नवीन ग्रामपंचायतीची स्थापना झाली. गावात दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात सात ग्रामपंचायत सदस्य असून देखील शासनाच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविता आल्या नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसते आहे. महिलांना रोज सकाळी पहाटे तीन वाजता उठून दिड किलोमीटर पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासनाच्या वतीने या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. त्यात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्याने टाकी पर्यंत पोहोचवले जाते. परंतु विहिरीतच पाणी शिल्लक नसल्याने पाणी टाकीत जाणार कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे . वारंवार विद्युत मोटर नादुरु स्त होत असल्याने व ती दुरु स्त करण्यासाठी कित्येक दिवस वाट बघावी लागते. ग्रामसेवक बहुतकवेळा कार्यालयात अनुपस्थित असतो. त्यामुळे मोटार दुरुस्तीची तक्रार कोणाकडे करायची व त्याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न पडतो. याबाबत शासनाच्या वतीने एकदाच कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून ग्रामस्थांना वारंवार या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही अशी मागणी पुढे येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरी बेंडकोळी ,वामन बेंडकोळी, पांडू पारधी, काशिनाथ येराळे, आभळू बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोली आदी ग्रामस्थांनी आपली समस्या मांडली.