श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार दुरुस्ती
By Admin | Published: September 26, 2015 09:47 PM2015-09-26T21:47:12+5:302015-09-26T21:47:44+5:30
श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार दुरुस्ती
मालेगाव : येथील महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची सुमार पद्धतीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीगणेश भक्त व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
येथील श्रीगणेशोत्सवातील बहुतांश सार्वजनिक व घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कॅम्प बंधाऱ्यालगतच्या श्रीगणेश कुंड व गावात महादेव घाटालगतच्या कुंडात केले जाते. त्यासाठी कॅम्परोड, कॅम्प मेनरोड, शिवाजी रोड, गणेश कुंडरोड, कॉलेजरोड, सटाणारोड, संगमेश्वर, महात्मा फुले रोड या प्रमुख मार्गावरून सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या मिरवणुका निघत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून शहरातील इतर सर्व मार्गांसोबत या विसर्जन मार्गांचीदेखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसामुळे तर या मार्गांची बिकट अवस्था झालेली आहे. वाहनधारकांनाच नव्हे तर पादचाऱ्यांना देखील या रस्त्यांवरून चालणे मुश्कील होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींचेदेखील दुर्लक्ष झालेले आहे. यंदा किमान श्रीगणेशोत्सवानिमित्त तरी या रस्त्यांची डागडुजी होईल अशी आशा होती. श्रीगणेशाच्या स्वागत मिरवणुकीसाठी देखील प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी केली नाही. मनपा प्रशासन व संबंधित ठेकेदार यांनी सर्वसामान्य नागरिक व श्रीगणेशभक्त यांना गृहीत धरून त्यांच्या डोळ्यात धूळ फेक (रेती) केली असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व श्रीगणेशभक्त यांच्यातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)