नाशिक जिल्ह्यात आज पाच ठिकाणी ड्राय रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:51 AM2021-01-08T01:51:24+5:302021-01-08T01:52:21+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच देशपातळीवर लसीकरण करण्यात येणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील पाच ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे.
नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी लवकरच देशपातळीवर लसीकरण करण्यात येणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यातील पाच ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. या वेळी लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लस देण्यात येणार नसली तरी, त्यानिमित्ताने आरोग्य व्यवस्थेच्या तयारीची रंगीत तालीम करून घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री ग्रामीण रुग्णालय, नाशिक महापालिकेचे नवीन बिटको रुग्णालय व मालेगाव येथील मदनेनगर येथील शहरी आरोग्य केंद्रात सकाळी आठ वाजेपासून या ड्राय रनला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली. या रंगीत तालमीसाठी नियुक्त केलेल्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजताच केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ड्राय रनसाठी प्रत्येक केंद्रावर लाभार्थी म्हणून प्रत्येकी २५ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ड्राय रन सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे. गुरुवारी यासंदर्भातील तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात तयारीचा आढावा व पूर्ततेवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यास पहिल्या टप्प्यात १८,१३५ शासकीय आरोग्य कर्मचारी व १२,४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली असून, लसीकरणासाठी १,०२९ लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लस साठविण्यासाठी २१० आइस लाइन रेफ्रिजरेटर उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, डॉ. रवींद्र चौधरी, डाॅ. बापू नागरगोजे आदी उपस्थित होते.
अशी असेल व्यवस्था
n प्रत्येक केंद्रात ड्राय रनसाठी तीन रूम असतील. पहिल्या रूमला वेटिंग रूम म्हणून संबोधण्यात येईल. तेथे टोकननुसार लाभार्थ्यांना ६ फुटांच्या अंतरावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून बसविण्यात येईल. याच रूममध्ये प्रारंभी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तापमान घेऊन सॅनिटाईझ करण्यात येईल व मास्क वापरणे बंधनकारक असेल.
n दुसरी रूम व्हॅक्सिनेशन रूम असेल. याच रूममध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची ओळखपत्रानुसार ओळख निश्चित करण्यात आल्यावर त्याची ‘को-विन ॲप’मध्ये नोंद करण्यात येईल. लाभार्थ्यांना लसीकरणाविषयी संपूर्ण कल्पना दिली जाईल.
n तिसरी रूम ऑब्झर्वेशन रूम असेल. लाभार्थ्यांना लसीकरणानंतर किमान ३० मिनिटे बसविण्यात येईल. लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे या ठिकाणी अवलोकन करण्यात येईल.