कोरोनाला हरविण्यासाठी सुकेणा आर्मी मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:16 PM2020-04-21T22:16:12+5:302020-04-21T22:16:23+5:30
पुढाकार : जवानांच्या आर्थिक मदतीतून निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार
कसबे सुकेणे : येथील कोरोनाच्या लढाईला आता लष्करी बळ मिळत असून, आजी-माजी सैनिकांनी स्वखर्चाने जवळपास एक लाख रुपयांचे तीन निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार उभारले आहेत. लष्करी जवानांनी गावासाठी केलेल्या या मदतीचे स्वागत होत असून, कसबे-सुकेणे येथे स्थापन केलेल्या ‘सुकेणा आर्मी’ची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आहे.
कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी प्रशासन व ग्रामस्थ घेत आहेत. कोरोनाच्या लढाईत कसबे सुकेणेकरांना आता गावातील व परिसरातील लष्करी जवानांची मोठी मदत होत आहे. सुट्टीवर आलेले कसबे सुकेणे, ओणे, मौजे सुकेणे येथील काही जवान हे लॉकडॉउनमुळे अडकून पडले होते.
या जवानांचे कसबे सुकेणे येथे ‘सुकेणा आर्मी’ या नावाने बहुद्देशीय मंडळ आहे. आपली जन्मभूमी व गावकरी कोरोनाचा लढा देत असताना या सैनिकांमधला सैनिक जागा होऊन पोलिसांच्या परवानगीने हे सैनिक सुकेणेच्या नाकाबंदीत तैनात झाले.
केवळ नाकाबंदीत सेवा बजावून न थांबता सोशल मीडियाच्या आधारे सीमेवर तैनात असलेल्या इतर भूमिपुत्र जवानांना गावाकडे आलेल्या अरु ण भंडारे, दीपक वाघ, विजय विधाते, दीपक काळे, विठ्ठल तिडके, सागर मोगल, योगेश आवारे, आकाश
कंक यांनी आवाहन करून मदतीचे आवाहन केले. तीनही गावाच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण उभारण्यासाठी या जवानांनी आॅनलाइन तब्बल एक लाखांच्या आसपास निधी जमविला. या निधीतून कसबे सुकेणे गावाच्या पोळा वेशीवर पहिले निर्जंतुकीकरण कक्ष व प्रवेशद्वार उभारून कोरोनाच्या लढाईला मोठे बळ दिले आहे. मौजे सुकेणे व ओणे येथील प्रवेशद्वारांची कामे सुरू आहेत.