शहरात सर्वत्र शुकशुकाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:18+5:302021-04-12T04:13:18+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या वीकेंड बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला असून, शहरातील रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या वीकेंड बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला असून, शहरातील रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. एरव्ही गजबजून जाणारे रस्तेदेखील ओसाड दिसत होते. कोरोनाच्या वाढत्या धास्तीमुळे बहुतांश नागरिकांनी घरातच राहण्यास पसंती दिली होती.
सोमवार ते शुक्रवार पाच दिवस जमावबंदीचे झाल्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून जीवनावश्यक वगळता अन्य सर्व दुकानांना बंदचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा परिणाम रविवारीदेखील सकाळपासूनच पाहायला मिळाला. शहराच्या ज्या भागांमध्ये रोज नागरिकांची गर्दी असते अशा मुख्य बाजारपेठेसह सर्वच रस्ते बंद आहेत. काही शहरांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णाचे कुटुंबीय वणवण करीत भटकत होते. काही ठिकाणी भाजीपाला आणि अन्य अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लोक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. मात्र एकूण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या गत आठवडाभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता शहर व तालुक्यातील सर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवार असूनही शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट होता. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाणाऱ्यांना सूट दिली जात आहे. जुने नाशिक परिसरातच काही प्रमाणात सकाळी दूध, किराणा दुकाने उघडली होती. दरम्यान जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरेही बंद आहेत. या वीकेंड लॉकडाऊनला दुकानदार, विक्रेते, नागरिक यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
इन्फो
कोरोनाच्या धास्तीचा परिणाम
महानगरासह जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, रेमडेसिवीर मिळत नाही. अशा परिस्थितीत आजारी पडणे म्हणजे मोठ्याच संकटाला निमंत्रण याची जाणीव झाल्यामुळे या वीकेंड लॉकडाऊनमध्ये एकूणच नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा धास्ती वाढल्याचे दिसून येते. त्यामुळेच शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस शहराच्या बहुतांश भागात बंद पाळला गेला. नागरिकांच्या मनातील धास्तीचाच हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.
फोट
प्रशांत