‘सिरिया’च्या शांततेसाठी मुस्लिमांची बडी दर्गाच्या प्रारंगणात दुआ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:38 PM2018-03-03T15:38:36+5:302018-03-03T15:38:36+5:30
नाशिक : ‘सिरिया’मध्ये होत असलेला बॉम्बहल्ला मानवतेला काळिमा फासणारा असून, यामध्ये निष्पाप बालकांचा बळी जात आहे. सिरियाच्या भूमीतील मानवतेचा नरसंहार तातडीने थांबवावा, यासाठी संयुक्त राष्टÑसंघाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध मुस्लीम धार्मिक संघटनांकडून करण्यात आली. सिरियाच्या शांततेसाठी शुक्रवारच्या (जुमा) नमाजदरम्यान शहरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून सिरिया देशात बॉम्बहल्ल्याचा आगडोंब उसळला असून, यामध्ये शेकडो मुले, महिला मृत्युमुखी पडल्या आहेत. सिरियामधील नरसंहार माणुसकीसाठी घातक असून, सत्तेसाठी लढणाºयांनी हा नरसंहार तातडीने थांबवावा, अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. शुक्रवारी (दि.२) शहरातील रजा, नुरी अकादमीच्या वतीने बडी दर्गा येथे दुपारी भर उन्हात सिरियामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्टÑसंघाने तातडीने सिरियामधील बॉम्बहल्ल्याबाबत हस्तक्षेप करून सिरिया वाचविण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बॉम्ब हल्ल्यामुळे सिरियामध्ये निर्माण झालेल्या भयावह स्थितीच्या छायाचित्रांची फलके महिला व मुलांनी यावेळी झळकविली. दरम्यान, हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा यांनी यावेळी सिरियामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला उपस्थित शेकडो मुस्लीम बांधवांनी ‘आमीन’ म्हणन प्रतिसाद दिला.
मशिदींमध्ये प्रार्थना
सिरियासह फिलिस्तीनसारख्या देशांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत युद्धामुळे निष्पाप लोक मृत्युमुखी पडत आहे. सिरिया जगाच्या नकाशावरून नाहिसा होण्याची वेळ आली असून, मानवतावादी दृष्टिकोनातून सिरियाच्या शांततेसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत शहरातील विविध मशिदींमध्ये धर्मगुरूंनी शुक्रवारच्या प्रवचनातून व्यक्त केले. नमाजपठणानंतर जुने नाशिकसह वडाळागाव व आदी उपनगरीय भागातील मशिदींमध्ये सामूहिकरीत्या सिरियासह संपूर्ण जगात शांतता नांदावी, यासाठी धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली प्रार्थना करण्यात आली.