‘दूधसागर’ धबधबा खळाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:19 AM2017-07-24T00:19:42+5:302017-07-24T00:19:56+5:30
नाशिक :निसर्गरम्य वातावरणात कणीस अन् भजींचा आस्वाद घेत नाशिककरांनी मोठ्या संख्येने सोमेश्वरजवळील धबधब्याच्या परिसरात रविवारचा मनमुराद आनंद लुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पावसाची संततधार...सुटलेला थंडगार वारा... दुथडी भरून वाहणारी गोदामाई... डोळ्यांची पारणे फेडणारा अन् जणू नायगाराची प्रतिकृती भासणारा खळाळलेल्या दूधसागर धबधब्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले तसेच निसर्गरम्य वातावरणात कणीस अन् भजींचा आस्वाद घेत नाशिककरांनी मोठ्या संख्येने सोमेश्वरजवळील धबधब्याच्या परिसरात रविवारचा मनमुराद आनंद लुटला. सोमेश्वरजवळील नाशिककरांच्या पसंतीच्या दूधसागर धबधब्याचे रविवारचे रुपडे बघून नाशिककरांनी एकच जल्लोष केला. ग्रुप फोटो, सेल्फी अन् व्हिडीओद्वारे खळाळून वाहणारा आवडीचा दूधसागर धबधबा अनेकांनी टिपला. शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या या आवडीच्या धबधब्याचे सौंदर्य नाशिककरांनी आपल्यापुरतेच मर्यादित ठेवले असे नाही तर क्षणार्धात आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहणारा दूधसागर धबधबा व्हॉट्सअॅप व फेसबुकवर ‘पोस्ट’ केला. काही युवक-युवतींनी धबधब्यासोबत ‘सेल्फी’ तर काढल्याच; मात्र थेट फे सबुकवर लाइव्ह ‘सेल्फी व्हिडीओ’ आपल्या यादीतील लोकांना ‘टॅग’ केला. गंगापूर धरणातून शनिवारपासून हजारो क्यूसेक पाणी गोदापात्रात सोडले जात आहे. यामुळे सोमेश्वर मंदिरापुढे असलेला दूधसागर धबधबा मागील काही दिवसांपासून खळाळून वाहत आहे. या धबधब्याचे पावसाळ्यातील रूप अन्य दिवसांपेक्षा जरा वेगळेच असते. गंगापूर गावालगत गोदेच्या खडकाळ पात्रातील हे पाणी पंधरा ते वीस मीटर उंचीवरून खाली कोसळते यामुळे या ठिकाणी दूधसागर धबधबा तयार झालेला दिसून येतो.
स्थानिकांना रोजगार
विकेण्ड आणि गंगापूर धरणातून सातत्याने होत असलेला विसर्ग यामुळे दूधसागर धबधब्याच्या परिसरात नागरिकांची वर्दळ वाढल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. पावसाच्या सरी अंगावर झेलत नागरिक मका कणीस, भजी, चहाला पसंती देत असल्यामुळे गोदावरी परिचय उद्यानाच्या कोपऱ्यावरून पुढे मोठ्या संख्येने गंगापूर गावातील रहिवाशांनी दुकाने थाटली आहेत.