शिक्षकाअभावी विल्होळीला सेमी इंग्रजीचे वर्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:53 PM2019-07-09T18:53:35+5:302019-07-09T18:54:55+5:30
माध्यमिक विद्यालयातील पदवीधर शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक नसल्याने इयत्ता दहावी व नववीचे सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यासाठी प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला असता, पालकांनी त्यास कडाडून विरोध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील माध्यमिक विद्यालयात पदवीधर शिक्षक नसल्यामुळे शाळेने इयत्ता नववी व दहावीचे सेमी इंग्रजीचे वर्ग चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात आल्याने पालक शिक्षक मेळाव्यात पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून संस्थेच्या निर्णयाचा विरोध केला.
विल्होळी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक पालक संघाच्या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी होते. माध्यमिक विद्यालयातील पदवीधर शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक नसल्याने इयत्ता दहावी व नववीचे सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यासाठी प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला असता, पालकांनी त्यास कडाडून विरोध केला. विद्यार्थी पाचवीपासून सेमी इंग्रजीचे शिक्षण घेत असून, अचानक सेमीचे वर्ग बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने सदरचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करून पालकांच्या भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवावी असे पालकांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा, आधार कार्डमध्ये असलेल्या दुरुस्ती, उत्पन्न दाखल्याच्या समस्या, शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दप्तराचा बोजा कमी करणे, मुलींना मोफत बस पास, शिष्यवृत्ती कागदपत्रातील त्रुटी याबाबत पालकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. या मेळाव्याचा समारोपप्रसंगी शिक्षक व पालकांच्या हस्ते माध्यमिक विद्यालयाच्या आवारात नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सोमनाथ भावनाथ, वाळू नवले, लक्ष्मण भावनाथ, ज्ञानेश्वर चव्हाण, वसंत भावनाथ, ज्ञानेश्वर भावनाथ, पोपट मुंजे, बाबासाहेब गोसावी, अशोक भावनाथ, अरुण नवले, वसंत भावनाथ, रामदास गडाख, राजू गायकवाड आदीं उपस्थित होते.