लष्कराच्या भिंतीमुळे गावकऱ्यांचे दळणवळण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:27+5:302021-08-12T04:18:27+5:30
नाणेगाव-भगूर या ग्रामस्थांच्या मुख्य वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून लष्कराकडून संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे ...
नाणेगाव-भगूर या ग्रामस्थांच्या मुख्य वहिवाटीच्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून लष्कराकडून संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी अनेकदा नाणेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच लष्कराचे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान लष्कराने रस्ता देण्याचे मान्यदेखील केले होते, मात्र अद्याप रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही. याशिवाय नाणेगाव-भगूर या दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. ९) ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी डोईफोडे यांच्यासह खा. गोडसे यांची भेट घेऊन, हा रस्ता वहिवाटीसाठी खुला करण्याबाबत साकडे घातले. निवेदनावर सरपंच नंदा काळे, उपसरपंच विमल आडके, माजी सरपंच ज्ञानेश्वर काळे, विलास आडके, भगवान आडके, संजय आडके, सुनील मोरे, कैलास आडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
--------------
लष्कराने बांधकाम सुरू केल्यामुळे ग्रामस्थांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी आदींच्या वाहनांची वर्दळ असते. दोन गावांचा संपर्क शहराशी तुटू नये, यासाठी तातडीने रस्ता वापरासाठी खुला करावा.
- विलास आडके, नाणेगाव