नागरिकांच्या सजगतेमुळे वटवृक्षाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:04+5:302021-06-28T04:12:04+5:30

नाशिक : मखमलाबाद रस्त्यावर वटवृक्षाची अवैध कत्तल सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. शनिवारी ( दि.२६) दुपारच्या सुमारास ...

Due to the awareness of the citizens, the banyan tree got a lifeline | नागरिकांच्या सजगतेमुळे वटवृक्षाला मिळाले जीवदान

नागरिकांच्या सजगतेमुळे वटवृक्षाला मिळाले जीवदान

Next

नाशिक : मखमलाबाद रस्त्यावर वटवृक्षाची अवैध कत्तल सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. शनिवारी ( दि.२६) दुपारच्या सुमारास हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड करणाऱ्यांना रोखल्याने वटवृक्षाला जीवदान मिळाले.

दक्ष आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सजगतेमुळे संबंधितांना चार झाडांऐवजी झाडाच्या केवळ फांद्या कापता आल्या. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी व परिसरातील जागरुक नागरिकांनी केली आहे. चारच दिवसांपूर्वी वटपौर्णिमा झालेली असतानाच एका वडाच्या झाडाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांनीदेखील संताप व्यक्त केला. मखमलाबाद रस्त्यावरील ओमनगरमध्ये हे वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवसाढवळ्या, खुलेआम हा प्रकार घडल्याने हॅशटॅग चिपको चळवळीचे मखमलाबाद येथील कार्यकर्ते भूषण महाजन व सहकाऱ्यांनी झाडे तोडण्यास विरोध केला. संबंधित व्यक्तींना त्यांचे कृत्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचेही निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांना न जुमानता संबंधित नागरिक वृक्षाच्या फांद्या तोडण्यात मग्न होते. दरम्यान, गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात नेले मात्र, अवघ्या दोन तासांनी सोडून दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी येऊन तोडलेली लाकडे गोळा नेली. सायंकाळी उशिरा मनपा उद्यान विभागातर्फे घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

यासंदर्भात मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी संबंधित शेती मालकाला नोटीस बजावणार असून दोन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास एफआयआर दाखल केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरणतज्ज्ञ अश्विनी भट यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे झाडांची अवैध कत्तल करणाऱ्यांना प्रतिझाड १ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याने त्यानुसारच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वृक्षप्रेमी सोमवारी विभागीय व मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन झाड तोडणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे भूषण महाजन यांनी सांगितले.

फोटो

२७वृक्षतोड

Web Title: Due to the awareness of the citizens, the banyan tree got a lifeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.