नवरात्रोत्सवातही डीजेवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:19 AM2017-09-16T00:19:13+5:302017-09-16T00:19:19+5:30
: गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत्सवासारखा सण साजरा करताना दांडिया, गरबा खेळताना साउंड सिस्टीमचा आवाज किती असावा, यासंदर्भात काही निकष घालून दिले आहेत.
नाशिक : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रातही डीजेचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लागू केलेल्या नियमांप्रमाणे या विषयीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवरात्रोत्सवासारखा सण साजरा करताना दांडिया, गरबा खेळताना साउंड सिस्टीमचा आवाज किती असावा, यासंदर्भात काही निकष घालून दिले आहेत. यामध्ये वापरल्या जाणाºया डीजेच्या वापराला हरकत घेण्यात आली आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गणेशोत्सव आणि अनंत चतुर्थीला सक्तीने केलेली डीजेवर बंदी नवरात्रोत्सवातही कायम असणार आहे. नवरात्रोत्सवात कोणत्याही मंडळ व मंदिर परिसरात डीजेला परवानगी देण्यात आलेली नसून इतर साउंड सिस्टीम वापरताना आवाजाची मर्यादा पाळण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. यानुसार रहिवासी भागात ५५ ते ४५ डेसिबल इतके आवाजाच्या मर्यादेचे बंधन असून, शांतता क्षेत्रात ५० ते ४० डेसिबल आवाजाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. यामुळे दांडियाप्रेमी, मंडळाचे कार्यकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली असून, डीजेवाल्यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मंडळाचे पदाधिकारी संभ्रमात
नवरात्रोत्सव काळात डीजेसह साउंड सिस्टीम बुक करावी की नाही, या संभ्रमात मंडळाचे पदाधिकारी अडकले आहेत. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे आवाजाची मर्यादा पाळणार असून, डीजेला परवानगी द्यावी, अशा मागणीचे अर्ज केले असून, ते उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे परवानगी मिळते की नाही या अनिश्चिततेमुळे मंडळांनी साउंड सिस्टीमचे बुकिंगच केलेली नाही. त्यामुळे साउंड व्यावसायिकही धास्तावले आहेत.