हवामान बदलल्याने भाजीपाला कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2022 12:01 AM2022-01-09T00:01:06+5:302022-01-09T00:01:35+5:30
लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.
लखमापूर : वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे बळीराजाच्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्या फार प्रमाणात शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी, मालाची आवक घटली असून, मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावदेखील कडाडले आहेत.
शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणहून कर्ज व भांडवल उपलब्ध करून राहिलेली भाजीपाला पिके थोड्या फार प्रमाणात वाचवली. त्यामुळे बळीराजाच्या प्रयत्नांना यश आले. आता भाजीपाला पिकांना चांगला भाव वाढला आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे अतिशय महागडी औषधे फवारणी दिवसातून तीन वेळा करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सध्या भाजीपाला पिकांचे भाव गगनाला भिडले असले तरी त्यांचा फायदा शेतकरी वर्गाला काहीच नाही. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त हे समीकरण गुंतागुंतीचे होऊन बसले आहे. या महागाईची झळ सर्वसामान्य शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे.
सध्या बळीराजा दोन वर्षांपासून कोरोना, परतीचा पाऊस, हवामानातील बदल या अस्मानी संकटांनी त्रस्त असताना आणि यंदा आपल्याला सुटका मिळेल ही आशा असताना परत एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक इ.मध्ये चिंतेचे वातावरण सध्या दिसत आहे. भाजीपाला आवक घटली असून ग्राहक वर्गातून मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे.
भाजीपाल्याचे सध्याचे दर (किलो)
टोमॅटो : ४० ते ५० रु.
हिरवी मिरची : ८० ते ९० रु.
गवार : १०० ते १२० रु.
कोबी : २० ते ३० रु. (गड्डा)
फ्लॉवर : २० ते ३० रु. (गड्डा)
वांगी : ८० ते ८५ रु.
शेवगा : ७० ते ७५ रु.
मेथी : २० ते २५ रु. (जुडी)
शेपू : २० रु. (जुडी)
कांदापात : ३० रु. (जुडी)
कोथिंबीर : १५ ते २० रु. (जुडी)
बटाटे : २५ ते ३० रु.
कारले : ११० ते ११५ रु.
कांदा : ४५ रु.
भेंडी : ७५ रु.
सिमला मिरची : ८० रु.
गिलके : ३५ रु.
डांगर : २५ ते ३० रु. (नग)
दोडके : ५५ रु.
वाटाणा : ४५ रु.
पालक : १५ रु.
उसळ : २५ रु.
लसूण : १७० रु.
भोपळा, मुळा, वाल, डिंगरी, चवळी आदींचे भाव सोयीनुसार घेतले जातात.
सध्या जरी भाजीपाला पिकाला भाव मिळत असला तरी ग्राहक वर्गापर्यंत भाजीपाला विक्रीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. कारण भाजी बाजारपेठेमध्ये आवक अतिशय कमी होत असून, मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मिळत नसल्याने विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- बाळासाहेब सिरसाट, भाजीपाला विक्रेता.