चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला विहिरीत ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:11 AM2018-09-26T01:11:12+5:302018-09-26T01:11:31+5:30
चारित्र्याचा संशय घेत सतत भांडणाऱ्या पतीने कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पत्नीला विहिरीत ढकलून दिले, दैव बलवत्तर असल्याने ती वाचली, खोल विहिरीत असलेल्या कमरेएवढ्या पाण्यात उभी राहून रात्र काढल्यानंतर मंगळवारी (दि.२५) सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने तिला विहिरीबाहेर काढण्यात आले. तालुक्यातील गोंदे येथे ही घटना घडली.
सिन्नर : चारित्र्याचा संशय घेत सतत भांडणाऱ्या पतीने कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पत्नीला विहिरीत ढकलून दिले, दैव बलवत्तर असल्याने ती वाचली, खोल विहिरीत असलेल्या कमरेएवढ्या पाण्यात उभी राहून रात्र काढल्यानंतर मंगळवारी (दि.२५) सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने तिला विहिरीबाहेर काढण्यात आले. तालुक्यातील गोंदे येथे ही घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन पती सचिन हा भांडणतंटा, मारहाण करीत असे, सततच्या कटकटीला कंटाळून पत्नी गेली चार महिन्यांपासून त्याच्यापासून विभक्त राहत आहे. संशयाने मनात घर केले असल्यामुळे सचिन याने सततच्या भांडणाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी पत्नीला सोमवारी (दि.२४) सायंकाळी गोंदे येथे आणले. अंधार पडल्यावर ते दोघे गोंदे शिवारातील निलेश उन्हवणे यांच्या विहिरीजवळून जात असताना सचिन याने पत्नीला जोराचा धक्का देत विहिरीत ढकलून दिले व अंधाराचा फायदा घेत तेथून पोबारा केला. सुदैवाने विहिरीत केवळ कमरेपर्यंत पाणी असल्याने पत्नी बचावली. त्यानंतर रात्रभर तीने मदतीसाठी आरडाओरड करूनही तीच्या मदतीला कोणी आले नाही. मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास उन्हवणे यांच्या विहिरीतून महिलेचा आवाज येत असल्याचे ऐकून परिसरातील शेतकरी विहिरीकडे धावले. आत डोकाऊन पाहिले असता विहिरीत कमरेएवढ्या पाण्यात उभी असलेली महिला मदतीसाठी याचना करताना दिसली. शेतकºयांनी लागलीच नांदूरशिंगोटे येथील दूरक्षेत्रात माहिती दिली. माहिती मिळताच वावीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, उपनिरीक्षक मुख्तार सय्यद, पोलीस हवालदार प्रकाश गवळी, देवयानी सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकºयांच्या मदतीने महिलेला विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पती सचिन विघे याला ताब्यात घेतले असल्याचे समजते.