वातावरणातील बदलामुळे द्राक्ष मण्यांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:11 PM2019-10-26T13:11:48+5:302019-10-26T13:12:02+5:30
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे.
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे. सततचा पाऊस व हवामानात अचानक होणारा बदल यामुळे द्राक्ष पिकावर विपरीत परिणाम होत आहे. द्राक्ष मण्यांना तडे जात असून द्राक्ष मणी सडून गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावून घेतला आहे.साधारण एक महिन्यात बाजारपेठ व निर्यातीसाठी तयार होत असलेल्या द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणावर सुमारे ८० टक्के नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागेवर करपा व डावण्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.फ्लॉवरीग स्टेजला कुज येणे, पोंगाअवस्थेत घड जिरून जाणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान घडत आहे. यासाठी शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे अशी मागणी ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक रकीबे परिवाराकडून करण्यात येत आहे. ठेंगोडा येथील सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रातील असलेल्या द्राक्ष बागेचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी सहाययक पुष्पा गायकवाड यांनी तयार करून वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे सांगितले.या संदर्भात महसूल विभागाने संबंधित नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजाने पुढील कांदा पीक घेण्यासाठी लागणारे कांदा उळे या पावसामुळे बहुतांशी ठिकाणी वाया गेले असून शेतकऱ्यांना पुन्हा उळे टाकण्याची वेळ आली आहे.