बंदमुळे बाजार समितीत साडेचार कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:03+5:302020-12-09T04:11:03+5:30
पंचवटी : नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी, संचालक व व्यापाऱ्यांनीही भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत बंदला पाठिंबा दिल्याने ...
पंचवटी : नशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी, संचालक व व्यापाऱ्यांनीही भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत बंदला पाठिंबा दिल्याने बाजारपेठेच्या आवारात रोज होणारी सुमारे साडेचार कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, संपूर्ण बाजार समिती आवारात मंगळवारी (दि.८) शुकशुकाट पाहायला मिळाला. केंद्र शासनाने लागू केलेले नवीन तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधात असल्याचा आरोप करतानाच या कायद्यांमुळे बाजार व्यवस्थेचे कंबरडे मोडून शेतकऱ्याच्या फसवणुकीचे प्रमाण वाढीस लागण्याची भीती व्यक्त करीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत मंगळवारी (दि.८) केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.
हरियाना व पंजाबसह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत सुरू केलेल्या आंदोलनात मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. शेतकऱ्यांच्या आवाहनाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समतीच्या कर्मचारी व संचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे ‘शेतकरी कायदा रद्द करा’, ‘जय जवान, जय किसा’, मोदी सरकार हाय हाय, ‘हमीभाव आमचा हक्काचा’ या अशा घोषणांना बाजार समितीचा आवार दणानून गेला होता. आंदोलकांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर केंद्रातील भाजप सरकार केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, उपसभपाती रवींद्र भोये, संचालक संपत सकाळे, संजय तुंगार, दिलीप थेटे, शंकर धनवटे, तुकाराम पेखळे, युवराज कोठुळे, विश्वास नागरे, संदीप पाटील, पंचायत समिती सभापती विजया खांडेकर, हंसराज वडघुले, शेतकरी संघर्ष संघटनेचे कैलास खांडबहाले, विजय शेवाळे, रामचंद्र निकम, समाधान जाधव, गोकुळ काकड, संजय नलावडे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
इन्फो-
पवार बाजार समिती आवारातही कडकडीत बंद
पेठरोड येथील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीतही बंदचा परिणाम झाल्याने येथील व्यवहारही पूर्णपणे ठप्प होते. याठिकाणी कांदा, बटाटा यांसह विविध फळांचे व्यवहार होतात. मात्र येथील व्यापारी, अडतदार, कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने संपूर्ण बाजार समिती आवारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
इन्फो -
मुंबई, गुजरातचा भाजीपाला पुरवटा खंडित
भारत बंदमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कोणत्याही कृषी मालाचा लिलाव होऊ शकला नाही. त्यामुळे सुमारे ८० ते ८५ वाहनांतून मुंबईला रोज होणारा भाजीपाल्याचा पुरवठा खंडित झाला, तर गुजरातला जाणाऱ्या २५ ते ३० वाहनांनाही भाजीपाला उपलब्ध होऊ शकला नाही. नाशिकमधून आंदोलनाचे केंद्र बनलेल्या दिल्लीसह राज्यातील जळगाव, औरंगाबाद, यवतमाळसारख्या जिल्ह्यांनाही विविध भाजीपाल्याचा पुरवठा होतो. मात्र बंदमुळे य सर्व ठिकाणी होणारा भाजीपाला पुरवठा मंगळवारी खंडित झाल्याचे दिसून आले.
कोट-
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे बाजारपेठेबाहेर व्यवहार सुरू होऊन त्यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. बाजार समितीतील व्यपाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असून, त्यांच्याकडून निश्चित प्रमाणात अनामत घेऊनच त्यांना मालखरेदीची परवानगी दिली जाते. मात्र बाहेर होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही नियंत्रण उरणार नसल्याने फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होईल.
-देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती
इन्फो-
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागात सकाळपासूनच गर्दी होऊ दिली नाही. त्यामुळे बाजार समिती आवारात दिवसभर शुकशुटाक दिसून आला.