ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:51 PM2020-02-12T22:51:05+5:302020-02-12T23:50:28+5:30
इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने परिसरातील शेतकरीवर्ग चिंतित आहेत. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने दडी मारली अन् आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे काही परिसरात भाजीपाला पिके तसेच मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी कांद्याला विक्र मी बाजारभाव मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याच बरोबर गहू, हरभरा या पिकांनादेखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली असली तरी थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकºयांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहे. परंतु हवामानात सुधारणा न झाल्यास शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल यामुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
थंडी कमी असल्याने गव्हावर मावा, तुडतुडे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. या सोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. या प्रतिकूल हवामानामुळे कांद्यालाही करप्याने वेढले आहे.