थंडीमुळे द्राक्ष पिकाला अजूनही धोका
By admin | Published: January 17, 2017 12:44 AM2017-01-17T00:44:40+5:302017-01-17T00:45:00+5:30
शेतकऱ्यांना चिंता : मण्यांची फुगवण थांबली
सिद्धपिंप्री : डिसेंबर अखेरची थंडी आणि जानेवारीत राज्यातील सर्वांत नीचांकी तपमानाची नोंद अशा वातावरणात सिद्धपिंप्री परिसरातील द्राक्ष पिकाला चांगलाच फटका बसला आहे. द्राक्षमणी फुटल्याने उरलेसुरले द्राक्ष वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना बागावर पांघरूण घालण्याची वेळ आली आहे. दरम्यान, मकरसंक्रांतीपासून थंडी कमी जाणवत असली तरी ढगाळ वातावरणाचे संकट कायम आहे. नाशिक शहर परिसरात तसेच निफाडमध्ये सर्वाधिक कडाक्याची थंडी पडल्याने या भागातील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे. परिसरातील सिद्धपिंप्री, चितेगाव, खेरवाडी, लाखलगाव, माडसांगवी, विंचूरगवळी आदि परिसरात मेठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. या परिसरातील द्राक्ष पिकाला फटका बसला आहे. झाडांची मुळे थंडीमुळे गोठली असून, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्षांचा गोडवा कमी होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. (प्रतिनिधी)
बागांमध्ये शेकोटी
थंडीनंतर द्राक्षपीक वाचविण्यासाठी बागांना डिंपद्वारे पाणी दिले जात असून, बागांमध्ये शेकोटी पेटविली जात आहे. शिवाय द्राक्ष पिकाच्या वरच्या बाजूने कापड्याने रोपे झाकण्यात आली आहेत. काही ठिकाणी कागदही टाकला जात आहे. काहीप्रमाणात थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी दमट आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवित आहेत.