झाड कोसळल्याने कॅम्पातील वीज गायब
By Admin | Published: June 26, 2017 12:28 AM2017-06-26T00:28:14+5:302017-06-26T00:28:30+5:30
ंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव कॅम्प : शहरात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. तुरळक पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सतत वीज खंडित होत आहे. काल मध्यरात्री कॅम्प रस्त्यावर ११ केव्ही वीजतारांवर झाड कोसळल्याने तारांसह विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे मध्यरात्री वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला व समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्राहकांकडून वीज कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. कॅम्प रस्त्यावर वनविभाग कार्यालयासमोरील अतिभारित वीजतारांवर झाड कोसळल्याने रात्रीच वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे संगमेश्वर फीडरवरील वीजजोडण्या प्रभावित झाल्या. कॅम्प रस्ता, संगमेश्वर, साठफुटी रोड, १२ बंगला, बाजार समिती व्यापारी संकुलासह कॅम्पमधील काही परिसरात अंधार होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. लघु उद्योग कोलमडून पडले होते. वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. मालेगावात मान्सूनचे वेळेवर आगमन झाले आहे. शहरात वीज कंपनी व महानगरपालिकेतर्फे वीज पुरवठ्याबाबत मान्सूनपूर्व देखभाल झाली नाही. अनेक ठिकाणच्या तारा जीर्ण झाल्या आहेत, तर जादा जोडणीच्या भारामुळे झुकेलेले विद्युत खांब आहे त्या स्थितीत आहेत. काही ठिकाणी तारा जमिनीपर्यंत झुकल्या आहेत. यावर अद्याप दुरुस्ती अथवा देखभाल झालेली नाही. तारांमध्ये अडकलेले लहान मोठ्या झाडेझुडपांची छाटणी केली गेली नाही, त्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाल्यावर पाऊस व सोसाट्याच्या वारा आल्यास तारांमध्ये घर्षण होते व तांत्रिक बिघाड निर्माण होऊन वीजपुरवठा त्वरित बंद पडतो. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत; परंतु वीज कंपनीचे या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.