संविधानामुळे भारत देश एकसंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:54 PM2019-11-29T23:54:00+5:302019-11-30T01:03:31+5:30
विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशाने कितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.
येवला : विविध जात, धर्म, प्रांत, भाषा, परंपरा आणि संस्कृतीने नटलेल्या खंडप्राय भारत देशाला संविधानाने एकसंध ठेवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी या भारतीयांना मध्यवर्ती ठेवून केलेल्या आहेत. कोणत्याही देशाने
कितीही वक्रदृष्टी ठेवली तरी जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत हा देश एकसंध राहील, असा आत्मविश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केला.
येथील समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधानाने सामान्य माणसाला काय दिले?’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना न्या. गोखले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे होते.
प्रारंभी माजी आमदार मारुतीराव पवार यांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहकार नेते अंबादास बनकर, तहसीलदार रोहिदास वारुळे, येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, भारतीय सेना दलात २८ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले साताळी येथील भूमिपुत्र अरुण नामदेव कोकाटे यांचा न्या. गोखले यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मेजर कोकाटे यांच्या मातोश्री मुक्ताबाई कोकाटे, पत्नी ज्योती कोकाटे उपस्थित होत्या. मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. गमे यांनी केले. प्रा. अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संत तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी या अभंगावर नृत्य सादर केले. पाहुण्यांचा परिचय अॅड. बाबासाहेब देशमुख यांनी करून दिला. दिनकर दाणे यांनी आभार मानले.