कोरोनामुळे यंदाही ‘हज’ला मुकावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 01:12 AM2021-06-14T01:12:56+5:302021-06-14T01:13:15+5:30
सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सौदीमधील स्थानिक ६० ते ६५ हजार नागरिकांनाच हज यात्रा करता येणार आहे. हज यात्रा करणाऱ्या इतर देशांमधील इच्छुकांना कोरोनामुळे प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे सौदीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या भारतीय मुस्लिमांना दुसऱ्यांदा यात्रेला मुकावे लागणार आहे.
नाशिक : सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सौदीमधील स्थानिक ६० ते ६५ हजार नागरिकांनाच हज यात्रा करता येणार आहे. हज यात्रा करणाऱ्या इतर देशांमधील इच्छुकांना कोरोनामुळे प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे सौदीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या भारतीय मुस्लिमांना दुसऱ्यांदा यात्रेला मुकावे लागणार आहे. मात्र भारतीय हज कमिटीच्या संकेतस्थळावर रविवारी (दि.१३) उशिरापर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.
सौदी सरकारच्या प्रेस एजन्सीद्वारे शनिवारी हज यात्रेबाबत घोषणा करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही हज यात्रेवर हज व उमराह मंत्रालय, सौदीकडून अन्य परदेशांमधील नागरिकांना हज यात्रेसाठी येता येणार नाही आणि सौदी अरेबियामधील १८ ते ६५ वर्षे वयोगटातील असे नागरिक की ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे, तेच हज यात्रेसाठी पात्र ठरू शकतील असे म्हटले आहे. सौदी अरेबियामधील केवळ ६५ हजार स्थानिक नागरिकांना हजला जाता येणार आहे.
मागील वर्षीसुध्दा हज यात्रेवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सौदी सरकारकडून केवळ स्थानिक एक हजार लोकांनाच हज यात्रेकरिता निवडण्यात आले होते. यावर्षीही हज यात्रा मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. यामुळे भारतातून हज यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मुस्लीम भाविकांचा हिरमोड झाला आहे. यावर्षी तरी हज यात्रेसाठी नंबर लागेल आणि हज पूर्ण करण्याचे मोठे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा अनेकांनी बाळगली होती. मात्र सौदी सरकारनेे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाने यावर्षीसुद्धा भारतीयांना हज यात्रेसाठी उड्डाण करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी सुमारे वीस लाखांपेक्षा अधिक मुस्लीम नागरिक जगभरातून हज यात्रेसाठी सौदी अरेबियामधील पवित्र धार्मिक स्थळ मक्का-मदिना येथे हजेरी लावतात. हज यात्रेच्या माध्यमातून सौदी सरकारला सुमारे ९० हजार कोटी रुपयांचे (१२ अब्ज डॉलर्स) इतका महसूल मिळतो.
---इन्फो---
जुलैमध्ये होणार हज यात्रा
भारत सरकारकडूनदेखील हज यात्रेकरिता तयारी पूर्ण करण्यात आली होती. अलीकडेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हज यात्रेबाबत बोलताना सौदी सरकारकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य असेल असे सांगितले होते. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बकरी ईदच्या आठवडाभरापूर्वी हज यात्रेला प्रारंभ होणार आहे. दरवर्षी इस्लामी कालगणनेतील जिलहिज्जा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हज यात्रा पार पडते.