कोरोनामुळे हरिनाम सप्ताहाची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:00 PM2020-04-08T23:00:04+5:302020-04-08T23:00:18+5:30
सचिन सांगळे । सिन्नर : वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक ...
सचिन सांगळे ।
सिन्नर : वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली आहे. कीर्तन-प्रवचनकार घरी असून, त्यांनी स्वत:ला शेती आणि घरकामात गुंतवून घेतले आहे. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार हे सोशल मीडियाद्वारे आपली कीर्तने-प्रवचन सेवा देत आहेत. अनेकांची प्रवचने फेसबुकवरही सध्या लाइव्ह सुरू आहेत.
फाल्गुन आणि चैत्र या महिन्यांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, जत्रा, यात्रा, मेळावा, उत्सव मोठ्या प्रमाणावर असतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहाची संख्याही मोठी असते. कीर्तनकार-प्रवचनकार व्यस्त राहतात. यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे १४ एप्रिलपर्यंत देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनी कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या सिन्नर तालुक्यात छोटे-मोठे १०० ते १२५ प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. वेगवेगळ्या तारखांंना असलेले हरिनाम सप्ताह काकड आरती, गाथा पारायण व भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तने, गाव पंक्ती असे दिनक्र म असतात. ग्रामीण भागात आख्खे गावच या काळात भक्तिरसात न्हाऊन निघते. तालुक्यातील कीर्तनकार बाहेर जातात आणि दूरवरचे कीर्तनकार सेवेसाठी गावी येतात. काही कीर्तनकार कोरोनाबाबत स्थानिकांचे प्रबोधन करीत आहेत. हरिनाम सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी काही गावांमध्ये सप्ताह कालावधीत केवळ एकच विणेकरी मंदिरात उभा राहून अखंड नाम घेणार आहे. इतर सर्व कार्यक्र म रद्द केले आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे सर्व कीर्तनकार सांगत आहेत.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रेणुकामाता मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे ४२ वे वर्षे होते. सप्ताह काळात येथे राज्यातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार सेवा देतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर येथील सप्ताह स्थगित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात अखंडपणे सुरू असलेल्या भजनाच्या परंपरेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंड पडला आहे. तसेच दररोज पहाटे होणारा काकडाही बंद झाला आहे. येथील भजनी मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला मंदिरात भजन कार्यक्र माची सेवा सुरु होती. यावर्षी संपूर्ण जगात व भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे तसेच लॉकडाउनमुळे मंदिरेसुद्धा बंद असल्याने ही सेवा खंडित झाली आहे.
सरकारच्या सोबत आम्ही सर्व वारकरी आहोत. सर्व नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे. कोरोनाचे संकट लवकर दूर कर असे साकडे आम्ही पांडुरंगाकडे घालत आहोत. सध्या आम्ही बहुतांशी कीर्तनकारांनी स्वत:ला शेतात आणि कुटुंबात अडकून घेतले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कीर्तनसेवा बंद ठेवली आहे.
- ह.भ.प. कैलास महाराज तांबे, तालुका अध्यक्ष, वारकरी संघटना