कपाटकोंडीमुळे स्थायीच्या सभापतींचीच कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:00 AM2018-07-22T01:00:11+5:302018-07-22T01:00:26+5:30
कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना पक्षाने स्थानिक स्तरावर जाब विचारला आहे. इतकेच नव्हे तर आता इतिवृत्तात ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे.
नाशिक : कपाटकोंडी फोडण्यासाठी शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटरचे करण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्तांच्या प्रस्तावात सोयीचे बदल करण्याऐवजी गैरसोयीचे बदल केल्यामुळे स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांना पक्षाने स्थानिक स्तरावर जाब विचारला आहे. इतकेच नव्हे तर आता इतिवृत्तात ती चूक दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. शहरातील कपाटकोेंडीमुळे अडचणीत आलेल्या इमारती मुक्त करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कलम २१०चा वापर करून शहरातील सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी मिळकतधारकांना आवाहन करायचे आणि जे मिळकतधारक त्याला प्रतिसाद देतील त्यांना भविष्यात सर्वच रस्ता नऊ मीटर होईल या अपेक्षेवर तीस टक्के अतिरिक्तचटई क्षेत्र देण्याचा प्रस्ताव मांडला होता. गेल्या ६ जुलैस हा ठराव मंजूर झाला खरा, मात्र या प्रस्तावात एक वर्ष मुदतीसाठी ही सवलत योजना असल्याचा उल्लेख करू नये तसेच स्थायी समितीवर वेळोवळी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची तरतूद करून अधिकार आयुक्तांऐवजी स्थायी समितीकडे घेण्याची सूचना सभापती हिमगौरी आडके यांना करण्यात आली होती, असे सांगण्यात आले. त्यांनी मात्र आयुक्तांचा प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर करून त्यांच्याकडे पाठवून दिला. त्यावर सूचक व अनुमोदक म्हणून उद्धव निमसे व भाग्यश्री ढोमसे यांच्या सह्या आहेत. याप्रकारामुळे भाजपात अंतर्गत वादंग सुरू झाले. त्यातच अन्य अनेक विषय तहकूब ठेवण्याचे पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ठरले असताना आडके यांनी ते मंजूर केल्याने भाजपासह १२ सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन निर्णय मान्य नसल्याचे कळविले आहे. दरम्यान, कपाटकोंडीच्या निमित्ताने रस्ता रुंदीकरणाबाबतचा ठराव परस्पर केल्याप्रकरणी सभापती हिमगौरी आडके यांना जाब विचारण्यासाठी शनिवारी (दि. २१) वसंत स्मृती येथे समितीचे नऊ सदस्य आणि गटनेत्यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी आडके यांना जाब विचारण्यात आला. त्याचप्रमाणे आता सभेचे इतिवृत्त मंजुरीसाठी आल्यानंतर त्यात बदल करून ठराव पाठविण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. याशिवाय यापुढे ठरावांचे सूचक आणि अनुमोदक म्हणून दिनकर पाटील व उध्दव निमसे यांना अधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपातील अंतर्गत वाद हा पालिकात वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
आता संघामार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी
आयुक्त तुकाराम मुंढे आणि स्थानिक भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक उफाळून आला आहे. करवाढ रद्द करण्याच्या विरोधात महासभेत केलेला ठराव आयुक्तांनी फेटाळून लावल्याने भाजपाचे पदाधिकारी अधिक संतप्त झाले आहेत. शनिवारी (दि. २१)राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या काही ज्येष्ठ स्वयंसेवकांना वसंत स्मृती येथे पाचारण करून मुंढे यांच्या कामगिरीविषयी तक्रारी करण्यात आल्याचे समजते. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पक्षाचे नगरसेवक निवडूनही येणार नाही असे सांगतानाच या विषयावर तातडीने तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने सोमवारी बैठक बोलवावी अन्यथा आयुक्तांच्या विरोधात पुढील आठवड्यात विशेष महासभा बोलविण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.