दारणा पुलाच्या तड्यामुळे प्रशासनाची धावपळ
By admin | Published: August 5, 2016 01:45 AM2016-08-05T01:45:53+5:302016-08-05T01:46:02+5:30
दारणा पुलाच्या तड्यामुळे प्रशासनाची धावपळ
नाशिक : मुंबई-गोवा महामार्गावरील सरस्वती नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्यामुळे नदी, नाल्यावरील जुन्या पुलांबाबत निर्माण झालेल्या भीतीने आज दुपारी जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडवली. अज्ञात व्यक्तीने नाशिक-पुणे रोडवरील दारणा पुलाला तडे जाऊन छिद्रे पडल्याचा दूरध्वनी केल्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस व महामार्ग प्राधिकरणाला खातरजमा करण्याची सूचना केली, त्यानंतर या पुलाची डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
दुपारी साडेबारा वाजता अज्ञात व्यक्तीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दूरध्वनीवरून माहिती देताना नाशिक-पुणेरोडवरील दारणा नदीच्या पुलाला ठिकठिकाणी छिद्रे पडून नदीचे पाणी या छिद्र्यांमधून दिसत असल्याचे सांगितले. पुलाच्या या परिस्थितीमुळे नाशिक-पुणे रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचीही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही ताबडतोब जाऊन खात्री करण्याची सूचना खेडकर यांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी दारणा पुलावर धाव घेऊन पाहणी केली असता, पावसामुळे पुलाच्या रस्त्याला खड्डे पडले असून, ते बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. खड्डे बुजविताना पुलावरील वाहतूक थांबविण्यात येत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.