मताधिक्यात घट झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:15 AM2019-05-25T01:15:54+5:302019-05-25T01:16:17+5:30
देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला.
देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला. विधानसभेलाही पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेलाच सिन्नरकर जवळ करतील म्हणून लोकसभेची आकडेवारी पुन्हा विधानसभेला हीच असेल, असे म्हणणे धाडसाचे होईल!
सिन्नर मतदारसंघात सुमारे तीन लाख मतदार असल्याने कोकाटे लोकसभा निवडणुकीत सिन्नरच्या जोरावर टक्कर देतील असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघात आघाडी घेतली. कोकाटे स्थानिक असूनही पाहिजे त्या प्रमाणात सिन्नर विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. असे असले तरी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा सुमारे ३४ हजार ५०० मतांनी आघाडी घेतली. एकमेव सिन्नर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार गोडसे यांना रोखण्यात कोकाटे यांना यश मिळाल्याचे दिसून आले. मात्र अन्य मतदारसंघात कोकाटेंची जादू चालली नाही. सिन्नरकरांनी व्यक्तीनिष्ठा जपल्याचे आकडेवारीहून दिसून आले. गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना १ लाख ४ हजार ३१ मते मिळाली होती. तर भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांना ८३ हजार ४७७ मते मिळाली होती. विधानभा निवडणुकीपेक्षा कोकाटे यांना लोकसभेच्या निवडणुकीत ७ हजार ६३७ मते जास्त मिळाली आहेत. २०१४ च्या विधानसभेला २ लाख ७१ हजार मतदार होते. तर २०१९ च्या लोकसभेला सुमारे ३ लाख मतदार होते. म्हणजे सुमारे २९ हजार मतदार वाढले होते. त्या तुलनेत कोकाटे यांना मते वाढल्याचे दिसून आले.
येत्या विधानसभा निवडणुकीत युतीकडून राजाभाऊ वाजे पुन्हा उमेदवारी करू शकतात. वाजे यांच्यासमोर लढत देण्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे किंवा त्यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची लढत वाजे विरुध्द कोकाटे अशीच रंगेल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली यापेक्षा
कोणत्या व्यक्तीचा प्रभाव सिन्नरकरांवर जास्त राहिल यावरच विधानसभेचा निकाल ठरेल.मात्र, कोकाटे पुन्हा विधानसभेची उमेदवारी करतात का, यावर सिन्नरकरांची नजर असणार आहे.
कोकाटेंच्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अगोदर विधानसभा आणि आता लोकसभेला पराभूत झालेले कोकाटे विधानसभेला पुन्हा उमदेवारी करतात का याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कोकाटेंनी उमेदवारी केलीच तर ते अपक्ष राहतात का राष्टÑवादीत प्रवेश करतात याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. ऐनवेळी कोकाटे त्यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनाही विधानसभेच्या रणांगणात उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कोकाटे यांना लोकसभेला मिळालेली ९१ हजार मते दुर्लक्षून राजाभाऊ वाजे यांनाही चालणार नाही.