घटलेल्या टक्केवारीने निवडणूकेच्छूकांना धास्ती
By श्याम बागुल | Published: December 26, 2018 03:41 PM2018-12-26T15:41:00+5:302018-12-26T15:41:31+5:30
नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक
नाशिक : निवडणूक सहकार क्षेत्रातील बॅँकेची असली तरी, या निवडणुकीसाठी खेळले गेलेले डावपेच व केली गेलेली व्युव्हरचना लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या मैदानापेक्षा काही वेगळे नव्हती. संपुर्ण जिल्हा व त्याबाहेर मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असतानाही ज्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी घटली ते पाहता विशेष करून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघावर डोळा ठेवून असलेल्या निवडणूक इच्छुकांनी धास्ती खाल्ली आहे. कारण मध्य मतदार संघावर प्रभुत्व ठेवून असलेला बहुतांशी मतदार या बॅँकेचा सभासद आहे.
नाशिक मर्चन्ट बॅँकेच्या निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर झाल्यामुळे या निवडणुकीला सहकार क्षेत्रात मोठे महत्व प्राप्त झाले होते. बॅँकेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक क्षेत्रावर पकड मजबुत करण्याबरोबरच त्याचा राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचे मोठे माध्यम म्हणून त्याकडे पाहिले गेले. त्यामुळे बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता सुरूवातीच्या काळात बिनवरोध निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली व त्यासाठी गुप्त बैठका, चर्चेचे खल झाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीवर मध्य मतदार संघावर डोळा ठेवून असलेले माजी आमदार वसंत गिते व नगरसेवक गजानन शेलार यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे निवडणूक बिनविरोध होण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले. आपल्या राजकीय भवितव्यासाठी गिते यांना बॅँकेच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व नव्याने निर्माण करायचे तर शेलार यांनाही गेल्या काही वर्षातील राजकीय विजनवास दूर करण्यासाठी मोठी लढाई लढायची असल्याने त्यांनाही मर्चन्ट बॅँकेचे मैदान आयतेच मिळाले. परिणामी विधानसा निवडणुकीत परस्पर विरोधात लढण्याची तयारी ठेवणारे बॅँकेची निवडणूक एकत्र कशी लढवतील ? त्यातूनच बॅँकेत एक नव्हे तब्बल तीन पॅनल रिंगणात उतरले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तिन्ही पॅनलने जंग जंग पछाडले, समाजनिहाय बैठका, राजकीय भेटीगाठी, व्यापारी, व्यावसायिकांची मनधरणी करण्याचे सारे प्रयत्न करण्यात आले, गावोगावी सभा घेवून सभासद मतदारांना मतदानासाठी आग्रह करण्यात आला. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांची उदासिनताच दिसून आली. आर्थिक बाबीशी निगडीत असलेल्या विषयात बॅँकेच्या सभासदांनी दाखविलेली अनुत्सूकता पाहता, आणखी चार, सहा महिन्यांनी येवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत सामान्य मतदारांची काय मानसिकता असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कधी कधी परिवर्तनाला हातभारही लावते, तर कधी प्राप्त परिस्थिती कायम ठेवत असल्याचे निवडणूक इच्छूक चांगलेच जाणून आहेत.