वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:06 AM2019-11-25T01:06:39+5:302019-11-25T01:07:21+5:30
रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे.
नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. स्थानकातून बसेस नियोजित वेळेत सोडण्यात आल्या असल्या तरी नारायणगाव ते खेड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत बसेस अडकून पडल्या होत्या. एका बाजूने अत्यंत संथ वाहने सोडण्यात येत असल्याने दुपारी १ वाजता वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
नाशिकहून दररोज पुणे येथे शिवशाही, एशियाड आणि साध्या बसेस गाड्या धावतात. सुमारे दर अर्ध्या तासाने नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्याहून नाशिकला बसेसची वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे अन्य डेपोंच्या दोन्ही शहरांमध्ये येणाºया बसेसदेखील आहेत. रविवारी या सर्व गाड्यांना पुण्याला पोहोचण्याला आणि नाशिकला येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. खेड घाटात रविवारी पहाटे बंद पडलेला ट्रक सोडून ड्रायव्हर निघून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
एका बाजूला बंद पडलेला ट्रक, दुसºया बाजूला घाट आणि समोर तसेच मागेही वाहनांची रांग लागल्याने जागेवरून गाडी काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून वाहतूक कोंडी वाढतच गेली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि चालक जागेवर नसल्याची बाब बराच वेळानंतर लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ट्रक जागेवरून काढण्याचा मोठा प्रश्न होता.
वेळापत्रक कोलमडले
वाहतूक कोंडीत तासन्तास अडकल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. अनेक प्रवासी तर पहाटे तीन ते सकाळी ११ वाजेपर्यंत बसमध्येच अडकून पडले. विशेषत: महिला आणि लहान मुलांचे हाल झाले. घाटातच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सर्वच वाहनधारकांना विलंब झाला. दरम्यान, नाशिकहून सुटणाºया आणि पुण्याहून येणाºया बसेसदेखील विलंबाने धावत असल्याने महामंडळाच्या बसेसचे दैनंदिन नियोजनही कोलमडून पडले.