प्राथमिक सुविधांचा बोजवारा उडाल्याने आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:02 AM2019-05-29T01:02:10+5:302019-05-29T01:02:26+5:30
देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिकरोड : देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देवळाली गावातील सुंदरनगरमध्ये गोरगरीब सर्वसामान्य नागरिक राहतात. जयभवानीरोड खोले मळा येथून येणारा उघडा नाला, दुर्गंधी परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. विशेष म्हणजे सुंदरनगर म्हणून येणारा हा उघडा नाला रोकडोबावाडी रस्त्याच्या खालून दशक्रिया विधी शेड शेजारून सरळसरळ वालदेवी नदीत जाऊन मिळत आहे. नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी वालदेवी नदीत मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य, स्वच्छता धोक्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी अत्यंत कमी झाल्यानंतर नदीपात्राच्या मधोमध खोदलेल्या चारीमध्ये नाल्याचे पाणी कमी राहत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे.
सुंदरनगर लोकसंख्येच्या मानाने अवघे २० शौचालये असून, त्यापैकी पाच महिलांसाठी आहेत. त्यातील १०-१२ शौचालयांचे भांडे, दरवाजे, नळ तुटलेले आहेत. त्यामुळे रहिवासी व विशेष करून महिलांची मोठी गैरसोय होत आहे. मनपा प्रशासनाला वारंवार सांगूनसुद्धा कोणीच लक्ष देत नाही. सुंदरनगरच्या एका बाजूने घंटागाडी येते. मात्र रोकडोबावाडी रस्त्यावरून नाल्याजवळ राहणाऱ्या भागात घंटागाडी येत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे वत्सलाबाई इंगळे, उषा ढोले यांनी सांगितले.
उघड्या नाल्याची अर्धवट सफाई होत असल्याने दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे रहिम शेख यांनी सांगितले. उघडा नाला बंदिस्त करावा तसेच छोटी घंटागाडी नियमित वेळेवर आल्यास दुर्गंधीची मोठी समस्या मार्गी लागेल, असे रंजना शिंदे, संगीता पाटील यांनी सांगितले.
वालदेवीच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष
वालदेवी नदीत उघड्या नाल्यातील मिसळणारे दुर्गंधीयुक्त पाणी थांबविल्यास नदीची स्वच्छता टिकून राहील, असे अरुणा मोरे यांनी सांगितले. सुंदरनगर भागात छोटी-मोठी घरे व गल्लीबोळ असल्याने नियोजनपूर्वक स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे विजया कुमावत यांनी सांगितले. गरिबी व वाढत्या महागाईमुळे पोटाला चिमटा घेऊन जगावे लागते. तर दुसरीकडे अस्वच्छता व दुर्गंधी शरीराच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे मंगला सूर्यवंशी यांनी सांगितले.