धान्य घोटाळ्यातील आरोपीचा अनामत रकमेसाठी तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:43 PM2017-11-14T14:43:30+5:302017-11-14T14:45:47+5:30
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : राज्यात खळबळ उडवून देणाºया कोट्यवधी रूपयांच्या बहुचर्चीत सुरगाणा धान्य घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार व शासकीय धान्याचा वाहतूक ठेकेदार एकीकडे पोलीस दप्तरात फरार असल्याचे नमूद करण्यात आलेले असताना दुसरीकडे या वाहतूक ठेकेदाराने पुरवठा खात्याकडे धान्य वाहतूकीचा ठेका घेण्यासाठी भरलेली अनामत रक्कम परत मिळावी म्हणून तगादा लावला आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रूपयांच्या धान्य घोटाळ्यात शासकीय नुकसान केल्याचा ठपका सदर वाहतूक ठेकेदारावर निश्चित करण्यात आला असून, त्यापोटी त्याच्याकडून साडेचार कोटी रूपये वसुल केले जाणार आहेत.
सुरगाणा धान्य घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार मेसर्स एस. एन. कंपनीचे भागीदार मोरारजी भिकुलाल मंत्री, त्यांचा व्यवस्थापक संजय रामकृष्ण गडाख व साथीदार उगम पारसमल पगारीया या तिघांचा सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सुरगाणा धान्य घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या २५ आरोपींमध्ये या तिघांचा समावेश असून, उर्वरित सर्व आरोपींना ग्रामीण पोलिसांनी यापुर्वीच अटक केली तर काहींना न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. मात्र मंत्री, गडाख व पगारिया यांनी अटक टाळण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली म्हणून पोलिसांनी अद्याप त्यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केलेले नाही. परंतु या तिघांचा अर्ज फेटाळल्यानंतरही पोलिसांना त्याची खबर न लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेसर्स एस. एन. कंपनीने जिल्ह्यात रेशनचे धान्य वाहतूक करण्याचा ठेका घेतला होता व असा ठेका घेण्यासाठी पावणे तीन कोटी रूपये अनामत रक्कम पुरवठा खात्याकडे जमा केली होती. सुरगाणा धान्य घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळूनही पोलीस अटक करीत नसल्याचे पाहून ठेकेदार मंत्री याने अनामत रक्कम परत मिळावी यासाठी पुरवठा खात्याकडे तगादा लावला. पुरवठा खाते बधत नसल्याचे पाहून मंत्री यांनी थेट वकीलामार्फतच पैसे परतीसाठी नोटीस पाठविली आहे. एकीकडे पोलीस दप्तरात फरार असलेला आरोपी पुरवठा कार्यालयात मात्र राजरोस फिरत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. मात्र सुरगाणा घोटाळ्यात शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्याचा ठपका वाहतूक ठेकेदारावर ठेवण्यात आला असून, त्याच्याकडून साडेचार कोटी रूपये वसुल करावे असे आदेश आहेत. असे असतानाही त्याने पैशांसाठी तगादा लावावा ही बाब आश्चर्यकारक आहे.
(जोड आहे)