गोदाघाटावरील अस्वच्छतेमुळे आयुक्त तुकाराम मुंढे संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:05 PM2018-02-13T16:05:31+5:302018-02-13T16:09:25+5:30
पाहणी दौरा : आरोग्य विभागाला घेतले फैलावर
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाशिवरात्रीची सुटी असतानाही मंगळवारी (दि.१३) गोदाघाटावर पाहणी दौरा केल्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली. गोदाघाटासह नदी पात्रालगत ठिकठिकाणी घडलेल्या अस्वच्छतेच्या दर्शनामुळे आयुक्त संतप्त झाले आणि त्यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. दरम्यान, स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येणा-या ‘प्रोजेक्ट गोदा’चीही त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती जाणून घेतली.
आयुक्तांनी सकाळी रामवाडी पूल, गोदा पार्क, गांधी तलाव, अहल्यादेवी होळकर पूल, रामकुंड, दुतोंड्या मारूती परिसर ,रामसेतू, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, काझी गढी, संत गाडगेबाबा वसाहत, टाळकुटे पूल या परिसराची पाहणी करत विविध समस्या जाणून घेतल्या. गांधीतलाव, रामकुंड परिसरात घाण-कचरा आढळून आल्याने त्यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना फैलावर घेतले आणि येत्या २५ दिवसात संपूर्ण साफसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत तसेच गंगापूल मलनि:स्सारण केंद्राचीही पाहणी करत कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. याचवेळी, जॉगिंग ट्रॅकलगत त्यांना चेंबरमध्ये पिंपळाचे एक छोटे झाड वाढल्याचे दिसल्याने आयुक्त संतप्त झाले आणि त्याबाबतही त्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कंपनीने ‘प्रोजेक्ट गोदा’ राबविण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भातील प्रकल्पांची माहिती त्यांनी कंपनीच्या अधिका-यांकडून जाणून घेतली. सदर प्रकल्पांबाबतची थ्रीडी इमेज सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना केल्या आणि प्रकल्पांना गति देण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या गरजेनुसारच कामे होणार असल्याचेही त्यांनी संबंधित अधिका-यांना सुनावले. या पाहणी दौ-याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर,आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता संजय घुगे, एस. एम. चव्हाणके,उदय धर्माधिकारी , पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी,विभागीय अधिकारी नितीन नेर,बी. वाय. शिंगाडे, निर्मला गायकवाड यांचेसह स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी प्लॉटबद्दल अधिकारी अनभिज्ञ
आयुक्तांनी गोदाघाटावरील सुलभ शौचालयालगत असलेल्या घाण-कच-याबाबत आरोग्य विभागाला जाब विचारला. त्यानंतर, त्यांना एका मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकल्याचे निदर्शनास आले. सदर प्लॉट मनपाच्या मालकीचा आहे काय, अशी विचारणा त्यांनी अधिका-यांना केली परंतु, एकालाही त्याचे उत्तर देता आले नाही. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या एक महिला अधिकारी पुढे आल्या आणि सदर प्लॉट एका बांधकाम व्यावसायिकाचा असल्याचे सांगितले. आयुक्तांनी सदर प्लॉटवरील डेब्रीज उचलून घेण्यासंबंधी नोटीस बजावण्याचे आदेश दिले.