देवबाभळीमुळे नाट्यसंहितेला साहित्यात मानाचे स्थान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:18+5:302021-08-29T04:17:18+5:30
नाशिक : तरुण लेखकाला एक लखलखीत यश हे देवबाभळीने दिले, नाट्यसंहितेला मराठी साहित्यात वाङ्मयीन मूल्य देताना आखडता हात घेतला ...
नाशिक : तरुण लेखकाला एक लखलखीत यश हे देवबाभळीने दिले, नाट्यसंहितेला मराठी साहित्यात वाङ्मयीन मूल्य देताना आखडता हात घेतला जातो. युवा साहित्य अकादमीची देवबाभळीवर मोहोर उमटल्याने नाटकाला मराठी वाङ्मयीन मूल्य प्राप्त व्हायला प्रारंभ झाला आहे, असे प्रतिपादन नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवबाभळीकार प्राजक्त देशमुख यांच्या सत्काराप्रसंगी व्यक्त केले.
खूपदा साहित्यिक नाटककारांना थोड्या अंतरावरच ठेवतात असे दिसून येते. एखादं चांगलं साहित्य वाचल्यानंतर त्यावरून नाटक होईल का अशी विचारणा केली तर उत्तर येतं याचा आवाका मोठा आहे. अवघ्या २५ बाय २५ च्या तुमच्या रंगमंचावर अडीच तासात नाही बसणार हे. एखादं नाटकाचं स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याचं पुस्तकरूपी अस्तित्व असावं असं ही वाटतं तेव्हा ही मंडळी याचा जीव खूप छोटा आहे, कसं शक्य होणार म्हणून नाकं मुरडतात. मला वाटतं या सर्वांना देवबाभळीने समर्पक उत्तर दिले असल्याचे पाटील यांनी नमूद केले. काय नाही देवबाभळीत... गद्य आहे, पद्य आहे, संगीत आहे, भक्त आहे, देवही आहे, दंतकथा आहे, आजची गोष्टही आहे, स्त्री मनाचा हुंकार आहे आणि पुरुष मनाची असहायताही आहे! म्हणूनच देवबाभळी एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्राजक्तच्या रूपाने युवा साहित्य अकादमी पुरस्कार आपल्या शहराला मिळाला आहे. गावातील कुणालाही देशपातळीवर सन्मान मिळाला की आपल्या सर्वांनाच भरुन येते आणि त्याच भावनेने प्राजक्तच्या पाठीवर ही नाशिककरांची शाबासकीची थाप असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी केले. सहायक सचिव प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे यांनी आभार मानले.
इन्फो
...तर आनंद द्विगुणित
परशुराम साईखेडकरच्या रंगमंचावर माझे देवबाभळी नाटक सुरु झाले त्याच रंगमंचावर माझा सत्कार होत आहे, याचा आनंद निश्चितच आहे. परंतु हा आनंद तेव्हा द्विगुणित होईल, जेव्हा या नाट्यगृहासह महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहे नाटकासाठी खुली होतील, असे युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते देवबाभळीकार प्राजक्त देशमुख यांनी सांगितले.
फोटो
२७प्राजक्त