विकासकामे करण्यात दुजाभाव

By admin | Published: September 19, 2015 10:31 PM2015-09-19T22:31:36+5:302015-09-19T22:33:43+5:30

समस्या : प्रभाग ४८ मध्ये लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Due to development works | विकासकामे करण्यात दुजाभाव

विकासकामे करण्यात दुजाभाव

Next

नाशिक : प्रभागात असलेली अस्वच्छता, घंटागाडीची अनियमितता, ठरावीक भागात सातत्याने होत असलेली विकासकामे, प्रभागातील रस्त्यांवर डांबरीकरण नाही, पाण्याचे नादुरुस्त व्हॉल्व्ह अशा एक ना अनेक तक्रारींनी कामटवाडे येथील प्रभाग क्रमांक ४८ सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रभाग ४८ अंतर्गत येणारे कामटवाडे, निखिल पार्क, अंबिकानगर, अभियंतानगर, धन्वंतरी मेडिकल कॉलेज, वृंदावन कॉलनी आदि परिसरात ठरावीकच ठिकाणी विकासकामे होत आहेत. याभागात नागरीकरणात झपाट्याने वाढ होत असून सदनिकांमध्ये सातत्याने होणारी वाढ यामुळे रस्ते अरुंद होत चालले आहेत. रस्ते अरुंद होत चालल्याने प्रभागात घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत पोहचणे मुश्कील झाले आहे. घंटागाडी ज्या ठिकणी पोहचत नाही त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरसेवक अनिल मटाले यांनी महापौर अशोक मुर्तडक आणि राहुल ढिकले यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन केले असले तरी संपूर्ण प्रभागात विकासकामे होत आहेत असे नाही. दोन ठिकाणी असलेली व्हॉल्व्ह नादुरुस्तीची समस्या आडनावात साधर्म्य असलेल्यांच्या मळ्याला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी केली असावी असा संशय निर्माण न झाला तरच नवल. कारण एका ठिकाणी तातडीने समस्येचे निराकरण आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र सातत्याने वाया जाणारे पाणी असा विरोधाभास का असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

नगरसेवक फिरकलेच नाही
अंबिकानगर भागात गेल्या आठवड्यापासून पाण्याचे व्हॉल्व्ह दोन ठिकाणी नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मटाले यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता  परस्पर व्हॉल्व्ह दुरुस्त करणार्‍या व्यक्तीचा संपर्क क्रमांक देऊन धन्यता मानली. एकीकडे पाणी कपातीचे संकट गडद असताना व्हॉल्व्हमधून सातत्याने होणारी पाणी गळती बघण्यासाठी आणि तातडीने पाणी गळती रोखण्याच्या दृष्टीने  नगरसेवकांनी भेट देणे आवश्यक असताना नगरसेवक याठिकाणी फिरकलेच नसल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले.

Web Title: Due to development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.