प्रत्यक्ष सहभागामुळे ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटले : सत्यजित भटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:11 AM2019-03-12T01:11:12+5:302019-03-12T01:11:58+5:30
राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता.
नाशिक : राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता. परंतु, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंवर्धनाचे काम उभे राहिले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले असून, त्यामुळे हे सर्वजण पाणी बचतीकडे वळत असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले.
नाशिकमध्येपाणी बचतीच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सोमवारी (दि.११) पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. सत्यजित भटतळ म्हणाले, पानी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात सुरु असलेले जलसंवर्धनाचे काम वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमधील गावकऱ्यांच्या कष्टावरच अवलंबून आहे. पानी फाउंडेशन केवळ त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शनासोबत हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. राज्यात विविध सरकारांनी गेल्या ४० वर्षात अनेक प्रयत्न केले.
स्पर्धेत गावांमध्ये आशादायी चित्र
पानी फाउंडेशनला जलसंवर्धनात संपूर्ण यश मिळाले असे नाही. परंतु, स्पर्धेत सहभागी गावांमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ असतानाही स्पर्धेत सहभागी चार हजार गावांपैकी ७० टक्के गावांमध्ये आशादायी चित्र असून, तेथे एक वर्षापूर्वी असलेल्या भूजलपातळीच्या तुलनेत चांगली अथवा समान स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.