वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर
By admin | Published: November 4, 2015 11:42 PM2015-11-04T23:42:04+5:302015-11-04T23:42:26+5:30
वादामुळे पाणी आरक्षणाची बैठक लांबणीवर
नाशिक : पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला उपलब्ध साठा व त्याचे पुढच्या वर्षभरासाठी करावयाच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दरवर्षी होणारी बैठक यंदा लांबणीवर पडली असून, त्यामागे मराठवाड्याचा पाणीप्रश्नच कारणीभूत आहे. जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन झालेले नसताना जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने पाणी आरक्षण बैठक चांगलीच गाजण्याचे संकेतही मिळू लागले आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने टंचाईची परिस्थिती कायम राहणार आहे. अशाही परिस्थितीत जे काही पाणी आहे त्याचे पिण्यासाठी, उद्योग व सिंचनासाठी नियोजन करणे क्रमप्राप्त असून, साधारणत: आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात त्याचा निर्णय पालकमंत्री, जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला जातो. परंतु पालकमंत्री व जिल्हाधिकारी बोस्टनला गेल्यामुळे ही बैठक आॅक्टोबरमध्ये होऊ शकली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती होईल असे मानले जात असतानाच, जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा विषय अचानक पुढे आल्यामुळे जिल्ह्णातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसेच शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होऊन ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. जनक्षोभ उसळण्याची शक्यता गृहीत धरून बैठक लांबणीवर टाकण्यात आली असली तरी, या बैठकीमुळे धरणातील पाण्याच्या आवर्तनावर परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्णाचे पालकमंत्री हेच जलसंपदामंत्री असल्यामुळे तर या बैठकीला विशेष महत्त्व असून, प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे.
जायकवाडीसाठी गंगापूर समूहातून पाणी सोडले जात असून, त्यानंतर उर्वरित पाण्यातूनच नियोजन करावे लागणार आहे ते पाहता, नाशिक महापालिकेसह अन्य पाणीपुरवठा योजना, औद्योगिक विकास महामंडळ, एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र, त्र्यंबकेश्वर आदिंसाठी राखून ठेवण्याच्या पाण्यात मोठी कपात करावी लागणार आहे. शेतीसाठी गंगापूर धरणातून पाणीच मिळणार नसल्याने आरक्षण बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.