युवकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2015 11:43 PM2015-12-23T23:43:14+5:302015-12-23T23:49:49+5:30
घोटीजवळील घटना : तुटलेल्या रेल्वेरुळाची दिली माहिती
घोटी : परिसरातील मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील रुळाचा मोठा तुकडा तुटल्याचे लक्षात आल्याने एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत रेल्वेचा संभाव्य अपघात टाळला आहे. येथील विजय जाधव या तरुणाने प्रसंगावधान दाखवत तुटलेल्या रुळाची माहिती स्टेशन मास्तरांना देत स्वत:चा जीव धोक्यात घालून या रुळावरून येणारी दादर-वाराणसी गाडी थांबवून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
मुंबई-भुसावळ रेल्वेरुळाचा काही भाग तुटल्याचे बुधवारी सकाळी ७. ३५ वाजता घोटी येथील विजय जाधव या तरुणाच्या लक्षात आले. यावेळी जाधव यांना काय करावे ते सुचेना. रेल्वे स्थानक अथवा रेल्वे प्रशासनाचा यापैकी कोणाचाही संपर्क त्यांच्याकडे नव्हता. याचवेळी त्यांना आपला मित्र मिथुन बिडवे हा रेल्वे स्टेशनजवळ रहात असल्याचे आठवले. त्यानी क्षणाचाही विलंब न करता बिडवेला फोन करून पोल क्र मांक सांगून तेथे रेल्वे रूळ तुटला असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्तरला कळविण्यास सांगितले.
त्यानुसार बिडवे यांचा पुतण्या शुभम बिडवे याने रेल्वे स्टेशन गाठून स्टेशन मास्तरला घटनेची माहीती दिली.त्यानंतर स्टेशन मास्तरने तत्काळ ही माहिती इगतपुरी पर्यंतच्या सर्व रेल्वे केबिन्सला कळविली. मात्र या तोपर्यंत बराच वेळ गेल्याने इगतपुरीहुन नाशिककडे जाणारी वाराणसी एक्सप्रेस सुसाट वेगाने त्याच रु ळावरु न धावत असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचा अपघात रोखायचा असा निश्चय करून ते समोरून येत असलेल्या ट्रेनच्या दिशेकडे धावू लागले. त्यांनी हातवारे करून रेल्वे चालकाला पुढे धोका असल्याचे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी हातवारे करून रेल्वे रूळ तुटले असल्याचे चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाच्या हा प्रकार आला आणि त्याने गाडीचा वेग कमी केला. रुळ तुटल्याचे लक्षात आल्याने तुटलेल्या रुळापासून काही अंतरावरच गाडी थांबविण्यात चालकाला यश आले. त्यामुळे एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला असून अनेक प्रवाशांचे प्राणही वाचले आहे.
दरम्यान, रेल्व प्रशासनाने विजय जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानाची दखल घेवून त्यांचा व त्यांना मदत करणाऱ्या युवकाचा भुसावळ येथे सत्कार समारंभ अयोजित केला आहे. (वार्ताहर)
घोटीतील विजय जाधव गेल्या पंधरा दिवसापासून रेल्वे रु ळच्या कडेने दारणा नदी पात्रापर्यंत फिरण्यास जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी सहा वाजताच ते फिरण्यास निघाले होते. काही अंतर पार केल्यानंतर मुंबईहुन नाशिककडे जाणारी एक गाडी सुसाट वेगाने निघून गेली. ही गाडी पार झाल्यानंतर गाडीच्या हादऱ्याने रेल्वेरु ळाचा भला मोठा तुकडा तुटला असल्याची त्यांच्या लक्षात आली.
थंडीच्या दिवसात रेल्वे रूळ अंकुचन पावत असल्याने रेल्वे रु ळाला तडे पडत असल्याने अपघात होतात. दोन वर्षांपूर्वी या घटनास्थळाजवळच मंगला एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला होता. यात रेल्वे प्रशासनाची मोठी हानी झाली होती. मात्र तसाच प्रकार आजही घडल्याने केवळ युवकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला आहे.