दिवाळी सणामुळे नाशिक जिल्ह्यात मक्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:46 AM2018-11-02T11:46:49+5:302018-11-02T11:46:55+5:30
बाजारगप्पा : दिवाळी सणामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक वाढली असून, भाव स्थिर आहेत.
- संजय दुनबळे (नाशिक)
दिवाळी सणामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक वाढली असून, भाव स्थिर आहेत. मक्याला १४०० रुपये क्विं टलपर्यंतचा भाव मिळत आहेत. गव्हाचे भाव वाढले आहेत. मालेगाव बाजार समितीत दररोज ३५० ते ४०० ट्रॅक्टर मक्याची आवक होत आहे. येथे १२०० ते १४२५, सरासरी १३५० रुपये प्रतिक्विं टल भावाने व्यापाऱ्यांनी मक्याची खरेदी केली. बाजरीचा दर रोजी ७०० ते ८०० पोती आवक असून, बाजरीचे भाव स्थिर आहेत. दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजार समितीत मकाची आवक वाढली असल्याचे भुसार व्यापारी भिका कोतकर यांनी सांगितले.
चांदवड बाजार समितीतही मागील सप्ताहापासून मका लिलाव सुरू झाले असून, रायपूर येथील खरेदी-विक्री केंद्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. येथे दर रोज ५० ते ६० ट्रॅक्टर मक्याची आवक होत आहे. सरासरी १३७५ रुपये क्विं टलचा भाव मिळत आहे. नांदगाव बाजार समितीत बाजरी, मक्याची आवक टिकून आहे. दिवाळीमुळे मक्याची आवक वाढली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत मक्याच्या भावात घसरण झाली असून, सरासरी १३७० रुपये क्विं टल भाव आहे. बाजरी मात्र स्थिर आहे.
लासलगावात मका, सोयाबीनची आवक चांगली असून, भावही टिकून असल्याचे भुसार व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी सांगितले. सोयाबीनला ३२०० ते ३३०० रुपये क्विं टल भाव मिळत आहे. लासलगावी गव्हाचे भाव वाढले. मागील सप्ताहात २५० क्विंटल गव्हाची आवक होऊन भाव १९७० ते २९८६ आणि सरासरी २२८८ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत राहिले. जिल्ह्यातील पाण्याची स्थिती पाहता रबीच्या आशा मावळल्या आहेत. नवीन गव्हाच्या आशा कमी झाल्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली असल्याचे ब्रह्मेचा म्हणाले. ज्वारी, हरभरा, मूग, उडीद या कृषी मालाची आवक कमी आहे.