ड्रायपोर्टमुळे मिळणार जिल्हा बॅँकेला ‘बूस्ट’, निसाकाची थकबाकी वसुली होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:45 PM2017-11-17T15:45:15+5:302017-11-17T15:45:23+5:30
नाशिक : केंद्रीय भृपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहून अधिक हेक्टर जागेवर नियोजीत ड्रायपोर्टमुळे केंद्र सरकार आता ही जागा खरेदी करणार आहे. त्या बदल्यात जिल्हा बॅँकेची शेकडो कोटींची थकबाकी मात्र अनायास केंद्र सरकारकडून जागेच्या मोबदल्यात वसुल होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने निफाड व नाशिक सहकारी कारखान्याकडून सुमारे सव्वा दोनशे कोटींहून अधिकच्या थकबाकी वसुलीसाठी दोन वेळा वर्तमानपत्रातून कारखाने विक्रीसाठी व भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यातच आता नाशिकच्या ड्रायपोर्टचा मुददा उपस्थित झाल्याने जिल्हा बॅँकेला काहीसे हायसे वाटले आहे. निफाड साखर कारखान्याकडील सुमारे १३५ कोटींच्या थकबाकीसाठी कारखान्याच्या ताब्यातील दोनशे हेक्टरहून अधिक जमिन विक्रीसाठी जिल्हा बॅँकेने काढली आहे. ड्रायपोर्टसाठी लागणारी शंभर हेक्टर जागा केंद्र सरकार निफाड साखर कारखान्याकडून पर्यायाने जिल्हा बॅँकेकडून विकत घेण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात जी रक्कम मिळेल, ती जिल्हा बॅँक निसाकाच्या थकबाकी वसुलीपोेटी जमा करणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या वर्षानूवर्षे निसाकाकडील थकीत कोट्यावधीच्या वसुलीसाठी एकप्रकारे मदतच होणार आहे. केंद्र सरकारकडून ड्रायपोर्टसाठी निसाकाची जागा खरेदी करताना पन्नास एकरहून अधिक जागेत असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या वस्तुला धक्का लावण्यात येणार नाही. इतकेच नव्हे तर निसाका सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलेले असल्याने निसाकाही सुरू होण्यास मदत होणार आहे.