पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By Admin | Published: September 8, 2015 11:27 PM2015-09-08T23:27:36+5:302015-09-08T23:35:26+5:30
बाजार भरला : सर्जाराजाचा साज महागला
नाशिक : शेतकरीवर्ग वर्षभर मेहनत करून ज्यांच्या जिवावर शेतमळा फुलवितो त्या सर्जाराजाचा पोळा हा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून, बैल सजविण्याच्या वस्तूंनी बाजार भरला असला तरी दुष्काळाच्या सावटामुळे या साहित्याला अद्याप उठाव नाही. त्यातच सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
वर्षातून एकदा येणारा हा सण कर्ज काढून साजरा करूच, असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले. पंचवटी-पेठ रस्त्यावर जुन्या बाजार समितीलगत पोळ्यासाठी बैल सजावटीला लागणाऱ्या वस्तू विक्रीसाठी मांडलेल्या आहेत, परंतु या विक्रेत्यांनी सांगितले की, पोळा सण जवळ आला तरी दरवर्षीप्रमाणे यंदा दुष्काळामुळे खरेदीसाठी शेतकऱ्यांचा उत्साह दिसत नाही. त्यातच पर्वणीमुळे दोन-तीन दिवस बाजार बंद राहतो की काय अशी शंका विक्रेते आणि शेतकरीवर्ग दोघांनाही वाटत आहे.
यंदा बाजारात चवर, कासरा, पट्ट्या, गोंडे, केसरी, वेसण, माटोठी आदि वस्तूंचे भाव ५० ते १०० रुपयांनी वाढले आहेत. देवळाली गावातील चंद्रभागा आल्हाट व केशव आल्हाट हे विक्रेते पेठरोडवर बैलाचा साज विक्रीसाठी आले असून, त्यांनी मालाला उठाव नसल्याचे सांगितले. तर पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी दत्तू धनकर यांनी सांगितले की, दुष्काळामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. तरीही थोड्या फार प्रमाणात का होईना परंपरेप्रमाणे पोळा सण साजरा करावाच लागतो. (प्रतिनिधी)