दारणा नदीपात्रात बुडून चौघा शाळकरी मुलांचा मृत्यू

By admin | Published: May 28, 2017 01:50 AM2017-05-28T01:50:12+5:302017-05-28T01:50:46+5:30

नाशिकरोड : दारणा नदीपात्रात पोहण्यास गेलेले चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

Due to the drought in the Darna river, the death of four school children | दारणा नदीपात्रात बुडून चौघा शाळकरी मुलांचा मृत्यू

दारणा नदीपात्रात बुडून चौघा शाळकरी मुलांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : दारणा नदीपात्रात पोहण्यास गेलेले पळसे येथील दारणा संकुलमधील चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे शनिवारी (दि़ २७) सकाळी उघडकीस आले. सुमित राजेंद्र भालेराव (१५), कल्पेश शरद माळी (१५), रोहित आधार निकम (१४), गणेश रमेश डहाळे (१७) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे असून, ते सर्व एकाच भागातील रहिवासी असून, शाळकरी मित्र आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिवसभर केलेल्या अथक प्रयत्नामुळे या चौघांचे मृतदेह हाती लागले़ दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे़ उन्हाची तीव्रता व त्यातच धरणातून गत २०-२२ दिवसांपासून दारणा नदीपात्रात रोटेशननुसार पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहते आहे. बहुतांश ठिकाणी नदी, कॅनॉल, ओहोळ यामध्ये पोहणारे, अंघोळ करणाऱ्यांची गर्दी दिसून येते़ नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांमधील सुमित हा नाशिकरोडच्या जयरामभाई शाळेत नववीला, कल्पेश के. जे. मेहता शाळेत नववीला, रोहित जयरामभाई हायस्कूलमध्ये आठवीत, तर गणेशने जयरामभाई हायस्कूल मधील कनिष्ठ महाविद्यालयातून नुकतीच १२ वीची परीक्षा दिली होती़ या सर्वांचा मित्र शिवानंद रामप्रवेश गिरी याचा शुक्रवारी (दि़२६) वाढदिवस होता.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास शिवानंद, सुमित, कल्पेश, रोहित, गणेश हे सर्व एकमेकांना भेटले. वाढदिवस साजरा करणे व फेसबुक, व्हॉट््सअ‍ॅपवर शुभेच्छांचे पोस्टर बनवून टाकण्याबाबत यांच्यात बोलणे झाले. सुमित, कल्पेश, रोहित, गणेश या चौघांनी शिवानंद याला नदीवर घेऊन जाऊ असे सांगितले. मात्र शिवानंदला काम असल्याने त्याने नकार देत तो कामाचे पैसे घेण्यासाठी निघून गेला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास सुमित, कल्पेश, रोहित, गणेश हे पळसे गावच्या स्मशानभूमी परिसरात दारणा नदी किनारी अंघोळीसाठी गेले होते.
सायंकाळपर्यंत हे चौघेही मुले कुठेच दिसत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व गावातील सागर गोतिसे, अजिंक्य कुमावट, संतोष आहिरे, सनी जगताप, सोनू धोंगडे, गौरव जाधव, आरीफ शेख यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. सायंकाळनंतर नदी किनारीही शोध घेण्यात आला. मात्र, अंधारामुळे लक्षात आले नाही. या मुलांचे नातेवाईक, युवक आदिंनी त्या चौघांचे मित्र, नाशिकरोड रेल्वेस्थानक, रेजिमेंटल प्लाझामधील चित्रपटगृह, सिन्नर, महामार्गावरील धाबे आदि ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला. मात्र ही चौघी मुले कुठे भेटली नाही. रात्री उशिरा याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती़
या घटनेची माहिती नाशिकरोड अग्निशामक केंद्र व पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दारणा नदी पात्रात बोटीतून गळ, दोरी, होडीचा साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने पळसे थडी येथील नदी पात्रात विद्युत मोटारीच्या पाइपला अडकलेला सुमित भालेरावचा मृतदेह आढळला. त्यानंतर स्मशानभूमीजवळील जुन्या भैरवनाथ मंदिराजवळ कल्पेश माळी या मुलाचा मृतदेह मिळून आला. सकाळी १०.३० वाजेनंतर बोटीतून अग्निशामक दलाच्या जवानांनी पळसे थडीपासून बाभळेश्वर बंधाऱ्यापर्यंत बोटीतून सर्वत्र शोध घेतल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास गणेश डहाळे या मुलाचा मृतदेह सुमित ज्या ठिकाणी सापडला तेथून थोड्या अंतरावर आढळून आला, तर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रोहित निकम याचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला. जवानांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
दारणा नदीपात्रात बुडालेल्या मुलाचे मृतदेह शोधण्यासाठी नाशिकरोड अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल जाधव, एस. के. गायकवाड, एस. बी. निकम, आर. के. मानकर, एस. एस. पगारे, व्ही. बी. बागुल, बी. जी. कर्डक, आर. आर. काळे, एस. के. आडके, आर. एम. दाते यांनी शनिवारी दिवसभर परिश्रम घेऊन मुलांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

--इन्फो--
दारणा नदी किनारी उलगडा
बेपत्ता झालेले सुमित, कल्पेश, रोहित, गणेश यांचा शनिवारी सकाळी पुन्हा नातेवाईक व मित्रांनी शोध घेण्यास प्रारंभ केला. नदीवर गेले असतील म्हणून तेथे पाहण्यास गेले असता स्मशानभूमीजवळील परिसरात नदीकाठी तीन मुलांचे कपडे आढळून आल्याने ते शुक्रवारी दुपारी अंघोळीसाठी आले असतील आणि बुडाले असतील अशी भीती निर्माण झाली. मात्र तिघांचे कपडे असल्याने चौथा कोण व कुठे असावा, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी नदी किनारी कपडे धुत असलेल्या महिलेने दोघा मुलांनी एकापाठोपाठ नदीत अंघोळीसाठी उड्या मारल्याचे बघितल्याचे समोर आले़

--इन्फो--
परिसरावर शोककळा
दारणा संकुल भागातील गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झालेली चौघे शाळकरी मुले दारणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले असता ते बुडून मरण पावल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. शुक्रवारी दिवसभर पळसे ग्रामस्थ, युवक दारणानदी काठी बुडालेल्या मुलांच्या शोधार्थ मदत करत तळ ठोकून होते.

--इन्फो--
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
देवळालीगाव स्मशानभूमीत दुपारी सुमित भालेराव व पळसे येथील स्मशानभूमीत रात्री ८ वाजता गणेश डहाळे व रोहित निकमवर रात्री ११ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्पेशचे सर्व नातेवाईक धुळ्याचे असल्याने दुपारी त्याचा मृतदेह नातेवाईक धुळ्याला घेऊन गेले. यामुळे शोककळा पसरली होती.

--इन्फो--
शिवानंदाचे नशीब बलवत्तऱ़़
दारणा संकुल येथे राहणारा शिवानंद रामप्रवेश गिरी याचा शुक्रवारी वाढदिवस होता. शुक्रवारी दुपारी ११-१२ च्या सुमारास शिवानंद हा सुमित, रोहित, कल्पेश, गणेश आदि मित्रांना भेटला. सर्वांनी वाढदिवस साजरा करू, असे ठरविले होते. मात्र शिवानंद हा केटरिंगचेदेखील काम करत असल्याने तो पैसे घेण्यासाठी शिंदेगावाजवळील दोन लॉन्सवर गेला होता. मात्र त्याचे मित्र सुमित, रोहित, कल्पेश, गणेश हे दुपारी दारणा नदी पात्रात पोहण्यास आले. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असलेली चार मुलांपैकी शनिवारी सकाळी सुमित भालेराव, कल्पेश माळी या मुलांचे मृतदेह मिळून आले. शिवानंद याचे नशीब बलवत्तर असल्याने तो या चौघांसोबत न जाता कामाकरिता निघून गेल्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला.

Web Title: Due to the drought in the Darna river, the death of four school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.