पैठणीला दुष्काळाची किनार

By admin | Published: May 31, 2016 11:23 PM2016-05-31T23:23:02+5:302016-05-31T23:27:39+5:30

विणकरांमध्ये चिंतेचे वातावरण : गेल्या पाच महिन्यांपासून वाढले रेशमाचे भाव

Due to drought in Paithani | पैठणीला दुष्काळाची किनार

पैठणीला दुष्काळाची किनार

Next

 दत्ता महाले  येवला
पाण्याबरोबरच दुष्काळाचे सावट आता पैठणीवर पडले असून, गेल्या पाच महिन्यात रेशमाचे भाव ८०० ते १००० रु पयांनी वाढले असून, सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव ८०० रु पयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे. कांदाभाव घसरले आणि शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबत सध्या झाली आहे. येवला शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. कांद्यासह पैठणीला घसरण सुरू झाल्याने आता शहराची बाजारपेठदेखील मंदावली आहे. नवीन वर्ष सुरू झाले तेव्हा जानेवारीमध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रु पये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रु पये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता तर डबल पदराला ५५०० रु पये भाव मिळत होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. घरी एक अथवा दोन हातमाग असणाऱ्यांचे बरे चालले होते. परंतु गेल्या पाच महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३४०० रु पये प्रतिकिलो झाले तर उभार रेशीम ३६०० रु पये प्रतिकिलो एवढे वाढले आहे. आणि सध्या पैठणीच्या किमतीत घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४७०० रु पये भाव मिळत असून, डबल पदरी पैठणीला ४२०० रु पये भाव मिळत आहे. पाणी पाऊस नसल्याने पडलेला दुष्काळ हा नैसर्गिक असला तरी त्यासाठी माणूसदेखील तितकाच जबाबदार आहे. परंतु पैठणीच्या बाबत मंदीचे सावट नेमके नैसर्गिक आहे की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहेत. पैठणी तयार करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागतात. परंतु सध्या आठवडा भर काम करूनही केवळ ४०० ते ६०० रु पये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाले आहेत. भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो; मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात ४ ते ५ तास काम विणकर करत असल्याचे चित्र आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकराकडून खरेदी करणेदेखील व्यापाऱ्यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर पन्नास व शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकरांना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापाऱ्यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्र ीसाठी घेऊन जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही. स्थानिक व्यापारी बाजारपेठेतील उठाव पाहूनच भाव ठरवतात. सर्वसामान्य पैठणी उत्पादक विणकर व मजूर यांच्यात एकवाक्यता नसल्याने पैठणीचे व्यापारी कमी-अधिक दराने पैठणी खरेदी करत असतात. शिवाय आठवडाभर पैठणीचा नग तयार करून त्यात जर काही चूक निघाली तर पुन्हा ४०० ते ५०० रु पयाने नगाचा भाव घसरतो. सध्या जेमतेम रोजीरोटी कशीबशी भागविण्याची परिस्थिती सर्वसामान्य विणकर व मजुरावर आलेली आहे.
केंद्र सरकारने रास्त भावात रेशीम उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर किमान चार ते पाच केंद्र सुरू करावे, अशी मागणी विणकराकडून होत आहे. महिलांचे राजवस्र म्हणून कागदावर पैठणीला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली असली तरी, सध्या पैठणीची कलाकुसर तयार करणाऱ्या सर्वसामान्य विणकराना सक्रिय कृतियुक्त दिलासा विविध योजना राबवून देण्याची गरज आहे. ४०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रवास करणारी पैठणी मोठमोठ्या समारंभ व फॅशन शोमधून झळकत असली, तरी या व्यवसायाला घरघर लागली आहे. हवा तसा राजाश्रय मिळत नसल्याने पैठणीचे अर्थकारण सर्वसामान्य विणकराला अधोगतीकडे नेत आहे.

Web Title: Due to drought in Paithani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.