येवल्यात दुष्काळाची धग वाढली ; पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:59 AM2019-05-25T00:59:24+5:302019-05-25T00:59:39+5:30
प्यायला पाणी नाही, कुठून आणायचे? लाइट गेली, रॉकेल संपले... आता दिवा कशाचा लावू? जनावरांना प्यायला पाणी नाही, चाराही शिल्लक नाही, आणायचा कुठून?
पाटोदा : प्यायला पाणी नाही, कुठून आणायचे? लाइट गेली, रॉकेल संपले... आता दिवा कशाचा लावू? जनावरांना प्यायला पाणी नाही, चाराही शिल्लक नाही, आणायचा कुठून? आज बाजाराचा दिवस आहे हो, आठवड्याचा बाजार आणायचा आहे? कामच नाही तर बाजाराला पैसा आणायचा कुठून, असे अनेक सवाल ग्रामीण महिला कुटुंबप्रमुखाला विचारू लागल्या आहेत. समोर अनेक समस्या आ वासून उभ्या असल्याने कोणत्या समस्येला अग्रक्र म द्यावा, या संभ्रमात कुटुंबाचा कर्ता सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात दुष्काळाची धग वाढली आहे. दुष्काळी यादीत समावेश असूनही तालुक्याला कोणत्याच सोयीसवलती मिळालेल्या नाहीत. दुष्काळी कामे सुरू नसल्याने हातावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर अनेक कुटुंबांनी रोजगार मिळविण्यासाठी शहराकडे धाव घेतली आहे. तेथे मिळेल ते काम करून आपली भूक भागवावी लागत आहे. इतकी भयानक परिस्थिती यंदा तालुक्यात निर्माण झाली आहे.
तालुक्यातील दोन लाख नागरिकांना टॅँकरने पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. जवळपास १०६ गावे वाड्या-वस्त्यांना ५१ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी दिवसाकाठी १११ टॅँकरच्या खेपा केल्या जात आहेत. जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे तसतशी टँकरने पाणी मागणाºया गावांची संख्या वाढू लागली आहे. यात मानोरी बु।।, नागडे, रायते, चिचोंडी खु. चिचोंडी बु।। आदी गावांचा नव्याने टॅँकर प्रस्ताव पंचायत समितीला दाखल झाला आहे.
या गावांना टँकरने पाणीपुरवठा
खैरगव्हाण, कुसमाडी, पिंपळखुटे तिसरे, कोळगाव, वाईबोथी, खिर्डीसाठे, गुजरखेडे, अनकाई, सोमठाणजोश, पांजरवाडी, राजापूर, शिवाजीनगर, वाघाळे, हडपसावरगाव, भुलेगाव, धनकवाडी, वसंतनगर, नीलखेडे, नगरसूल, गारखेडे, गोरखनगर, डोंगरगाव, पन्हाळसाठे, धामणगाव, आहेरवाडी, लहित, आडसुरेगाव, सायगाव, कोळम बु।।, कोळम खु., कासार्खेडे, चांदगाव, नायगव्हाण, देवदरी खरवंडी, ममदापूर, तळवडे, खामगाव, देवळणे, देवठाण, बदापूर, मातुलठाण, आडगाव रेपाळ, कोटमगाव खु. कोटमगाव बु।।, तांदूळवाडी, गणेशपूर, सावखेडे, पुरणगाव व इतर वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.