सुरत-शिर्डी महामार्गावर धुळीमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:55 PM2019-04-27T18:55:06+5:302019-04-27T18:55:35+5:30
पिंपळगाव बसवंत : सुरत- शिर्डी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहनांमधून निघणाऱ्या धूराची पर पडली असून या रस्त्याने ये-जा करणाºया वाहनचालक व पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या महामार्गावर नियमित वर्दळ मोठ्या प्रमाणात असून गुजराथकडे व शिर्डीकडे जाणाºया साईभक्तांचे प्रमाणही अधिक आहे. या रस्त्याचे सध्या काम सुरु असल्याने धूळीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच या महामार्गाने जाणाºया काही रॉकेमिश्रित इंधनाचा वापर करणाºया वाहनांमधून निघणाºया धूराचीही त्यात भर पडलेली आहे. या धूळ आणि धूरामुळे हवेचे प्रदूषण होऊन त्याचा परिणाम पादचारी, दुचाकी तसेच छोट्या-मोठ्या वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या धुळीचे प्रमाण अधिक असल्याने कित्येकदा दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांना जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर ठिकठिकाणी मो-या अथवा पुलाचे काम केलेले आहे. त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. सुरत- शिर्डी राज्य मार्गाचे दुहेरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे, मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. शिर्डी ते सुरत महामार्गावरील रस्त्याचे काही काम झालेले आहे पण काही ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यावर काही प्रमाणात मुरूमही टाकण्यात आला आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरू आहे. खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला, तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे वाहने घसरून अपघात घडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहनधारक व नागरिकात बोलले जात आहे.