निवडणुकीमुळे ‘समृद्धी’ महामार्गाच्या विषयाला बगल
By admin | Published: February 10, 2017 01:13 AM2017-02-10T01:13:03+5:302017-02-10T01:13:19+5:30
प्रशासनही थंड : विरोधी उमेदवारांकडून प्रचाराचा मुद्दा
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी गेल्या महिन्यापर्यंत आग्रही असलेल्या प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल लक्षात घेता, आपली पावले संथ केली असून, दुसरीकडे महामार्गासाठी जागा संपादित करू पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीत हाच प्रचाराचा मुद्दा करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतील ४६ गावांमधून जाणार असून, त्यासाठी शासनाने रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून महामार्गाच्या बांधणीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या गटाची माहिती संकलित करून ती लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व भूमी अभिलेख खात्याच्या संयुक्त मोजणीला जमीनमालकांनी विरोध केल्यानंतर शासनाने त्यावर पर्याय म्हणून ड्रोनच्या सहाय्याने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात न जाता मोजणीही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही कडाडून विरोध करण्यात आला असतानाही रस्ते विकास महामंडळाने प्राधिकृत केलेल्या प्राधिकारी अधिकाऱ्यांनी या दोन्ही तालुक्यात महामार्गासाठी लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्या व त्यावर जागामालकांच्या हरकती तसेच सूचना मागविल्या असता, गावेच्या गावे या अधिसूचनेच्या विरोधात उभ्या ठाकून त्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्रेच शासनाकडे सादर केलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मंत्रालयात बैठका आयोजित करून खुद्द फडणवीस यांनीच लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग व्हावा व त्यासाठी शेतकऱ्यांना हवा तितका मोबदला देण्याची तयारीही शासनाने दर्शविली. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय पातळीवर जागामालक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता. महामार्गासाठी जागा संपादित करताना सरकारविरुद्ध वातावरण निर्माण होऊ नये याची काळजीही त्यांनी घेतली. तथापि, विरोधी पक्षांनी या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यास विरोध दर्शवून जागामालक शेतकऱ्यांच्या पाठीशी आपले बळ उभे केल्याने सत्ताधारी भाजपाची अडचण झाली. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू असून, त्यासाठी ‘समृद्धी’ च्या जागा संपादनाचा विषय प्रचाराचा मुद्दा करण्यात आला आहे.