चारा संपल्याने जनावरांना बाजाराची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 02:56 PM2019-05-10T14:56:07+5:302019-05-10T14:56:15+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात चारा संपुष्टात आल्याने पशुधनाला बाजाराची वाट दाखविण्याची वेळ आली आहे.
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात चारा संपुष्टात आल्याने पशुधनाला बाजाराची वाट दाखविण्याची वेळ आली आहे. पूर्व भागातील वावी, पांगरी, घोटेवाडी, वल्हेवाडी, शहा, मिठसागरे, पंचाळे, मलढोण, सायाळे, पिंपरवाडी, मीरगाव, दुसंगवाडी, पंचाळे या गावांमध्ये तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. शेतीला पाणी नसल्याने या भागात उदरनिर्वाहासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धउत्पादन सुरु केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे महागड्या दुभत्या गायी दिसून येतात. त्यातून होणाºया दुध उत्पादनातून कुटुंबाचा खर्च भागविला जातो. मात्र, या परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबरच चाराटंचाईने गंभीर स्वरूप धारण केल्याने शेतकºयांना पशुधन कवडीमोल भावाने विकणे भाग पडत असल्याचे दिसून येत आहे. वावी, कोपरगाव, सिन्नर येथील जनावरांसाठी आठवडे बाजारात गर्दी होताना दिसत आहे. चाराप्रश्न गंभीर झाल्याने ज्वारीचा कडबा महाग झाला आहे. हिरवा चारा म्हणून मक्याला प्रतिगुंठा पंधराशे तर दोन हजार रूपये तसेच उसाला चार ते साडेचार हजार रूपये मोजावे लागत असल्याने शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.