अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान
By admin | Published: August 4, 2016 01:12 AM2016-08-04T01:12:25+5:302016-08-04T01:12:37+5:30
अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतीचे नुकसान
त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसात तब्बल ४२१ मि.मी. असा विक्रमी पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात बसरला. अवघ्या तीन दिवसांत ४२१ मि.मी.पाऊस पडणे म्हणजे रेकॉर्डच म्हणावा लागले. या तुफान पावसाच्या माऱ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. उभी रोपे वाहून गेली आहेत. बांध फुटले. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची
मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली आहे.
त्र्यंबकला गेले तीन दिवस धुवाधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी बियाणे उपलब्ध करणे वगैरे सर्वच बाबी नव्याने करणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. त्यापेक्षा शेती नाही केली ते परवडले. एवढे नुकसान कुणाला झेपणार आहे, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशातला भाग नाही, मात्र अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी पंचनामे करून तातडीने मदत कार्य सुरू करावे. पीकविमा योजनेची मुदत वाढवून द्यावी, नदी-नाल्यांकाठी असलेल्या घरांचे व शहरात दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे. तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या भात पिकांचे नुकसान, नागली, वरई, खुरासणी, उडीद, भुईमूग आदिंचे पिकांचेही नुकसान झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी ओहळ, नाले, दुथडी भरून वाहत असल्याने जमिनीदेखील खचल्या आहेत.
पर्यायाने बांध फुटले आणि शेती वाहून गेली. त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कडलग यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
(वार्ताहर)