सेनेच्या कार्यकारिणीमुळे खदखद सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:56 AM2018-09-26T00:56:35+5:302018-09-26T00:57:34+5:30
नाशिक : शिवसेनेची प्रलंबित कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, मध्य नाशिक मतदारसंघातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. तथापि, यात प्रभाग तेरा मध्येच मोठ्या प्रमाणात पदे देण्यात आली असून, त्यात गटबाजीचे प्रतिबिंब उमटल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. नाशिक महानगर प्रमुखपदाचे दोन भाग केल्यानंतर
अद्यापही कार्यकारिणी घोषित करण्यात आली नव्हती. त्यासाठी पक्षाचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर ही कार्यकारिणी मुंबईला वरिष्ठांच्या संमतीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत होते त्याला अखेरीस मुहूर्त लागला असून, शिवसेनेच्या मुखपत्रात मंगळवारी (दि.२६) कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक मध्य उपमहानगर प्रमुख म्हणून राजाभाऊ क्षीरसागर, शरद देवरे, वैभव खैरे, संतोष ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संघटक म्हणून अनिल साळुंखे, कमलेश परदेशी, रवींद्र जाधव आणि वीरेंद्रसिंग टिळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यालयीन उपमहानगरप्रमुख म्हणून सचिन बांडे, अजय चौघुले, दत्ता दंडगव्हाण आणि शशिकांत कोठुळे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मध्य विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि चाळीस शाखा प्रमुख घोषित करण्यात आले आहेत. पक्षातील विरोधकांनी या कार्यकारिणीवर टीका केली असून, सर्वाधिक पदे प्रभाग १३ मध्ये देण्यात आली आहेत. मात्र महत्त्वाचे विधान सभा अध्यक्षपद जाणीवपूर्वक भरले नसल्याचा आरोप करण्यात येत आहेत. पक्षातील कार्यापेक्षा व्यक्तिगत संबंधांना स्थान देण्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अनेक पदे इतरत्र पसरविण्यात आली असून प्रभाग १३ मधील चिल्लर फेम उमेदवार प्रमोद नाथेकर यांना प्रभाग ३० साठी विभाग प्रमुख नेमल्यानेदेखील नाराज गटाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
अत्यंत उत्तम कार्यकारिणी
शिवसेनेच्या इतिहासात अशाप्रकारची सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांचे कार्य जाणून घेऊन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. दोन पदे केवळ कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींना सांगून मुद्दामहून वाढवून घेण्यात आली आहेत. आधी पक्षातील सर्वांची कामे जाणून घेऊन त्यानुसार त्यांना कार्यकारिणीत कुठे तरी संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. पक्षात केवळ जुन्यांनाच संधी दिली अशातला भाग नाही तर नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत संगम करण्यात आला आहे. शक्य त्यांना पक्षाने संधी दिली असून सर्वांना न्याय देणारी कार्यकारिणी म्हणून कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. आजवर शाखा प्रमुखांची अशाप्रकारे नियुक्ती झाली नव्हती, मात्र प्रभाग रचना बघता तेथही प्रभागाच्या तुलनेत शाखा प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेला बळकटी देणारी ही कार्यकारिणी आहे. - सचिन मराठे, महानगरप्रमुख
मिर्लेकर अंधारात
पक्षाचे उत्तर महाराष्टचे नेते रवींद्र मिर्लेकर यांना दाखवलेली यादी वेगळीच होती आणि नंतर त्यात बदल करण्यात आले असाही आरोप नाराज गटाकडून करण्यात येत आहेत. शाखा प्रमुख नेमण्याआधी शाखा तपासाव्यात, अशी मागणीदेखील या गटाने केली आहे.