देवपूर परिसरातील मोरांचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:53 PM2019-05-20T17:53:11+5:302019-05-20T17:53:46+5:30
देवपूर : एकेकाळच्या निसर्गरम्य व सिन्नर तालुक्यातील देवपूर परिसरात जागोजागी दिसणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेले गाव म्हणून पूर्वी देवपूरची ओळख होती. गावात प्रवेश करताच दृष्टीने पडणारी खळखळ वाहणारी देवनदी, काठावर असलेल्या पेरू, सिताफळ, बोरांच्या बागा मनाला उल्हसित करत असत. निसर्गाच्या सानिध्यात मोरांचे थवे निर्भयपणे बागडताना आढळून यायचे. येथील ग्रामस्थांना ही बाब नित्याची झाली असली तरी हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी पाहुणेमंडळी आवर्जुन देवपूरला यायची व हरवून जायची. तथापि आता मात्र, येथील चित्र बदलले आहे. एरव्ही उन्हाळ्यातही तुडंूब असलेले देवनदीचे पात्र आता कोरडेठाक पडले आहे. पावसाळ्यात पुरेशा पावासाअभावी देवनदीला पाणी नसल्याने काठावरील बागाही नाहीशा झाल्या. बागा तोडल्यामुळे सहज उपलब्ध होणारा रानमेवा आता खुपच कमी दिसू लागला आहे. आजही फळझाडे तुरळकच पहायला मिळतात. या फळझाडांच्या आश्रयाने असलेले मोरही पहायला मिळतात. तथापि त्यांना अन्नपाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी नाही. फळबागा नाही त्यामुळे मोरांची संख्याही कमी होत आहे. नदीच्या कडेला मोरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज आहे. पाणवठे झाल्यास मोरांची पाण्याच्या शोधार्थ होणारी भटकंती थांबेल. मोरांचे गाव असलेल्या गावातून मोर हद्दपार होण्याची भीती निर्माण होत आहे. वनखात्याने या संदर्भात अन्न व पाण्याची उपलब्धता क रुप द्यावी अशी मागणी होत आहे.