बिल थकवल्याने मनपाच्या शाळेचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:11 AM2018-12-27T01:11:51+5:302018-12-27T01:12:10+5:30
सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य शाळांचादेखील वीजपुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे.
नाशिक : सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य शाळांचादेखीलवीजपुरवठा खंडित करण्याची तयारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वीजपुरवठ्यासाठी देण्यात आलेला सहा ते सात लाख रुपयांचा निधी यापूर्वीच संपला असून, त्यामुळे मंडळाच्या अंदाजपत्रकातच अन्य तीन लेखाशीर्षाखाली असलेला निधी वीज देयकांसाठी वर्ग करावा यासाठी प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी तब्बल आठ पत्रे लेखा विभागाला दिली आहेत, परंतु लेखा विभागाने त्याची कोणतीही दखल न घेतल्याने ही नामुष्की महापालिकेवर आली आहे. महापालिकेच्या १२८ प्राथमिक शाळा होत्या. त्यांचे एकत्रीकरण करून आता ९० शाळा करण्यात आल्या असल्या तरी जुन्या शाळांमधील वीज मीटरदेखील कायम आहेत.
पाठपुरावा करूनही कार्यवाही नाही
महापालिकेने शाळांमधील मुलांना सायकली देणे किंवा अन्य काही योजनांसाठी तरतूद केलेला निधी यावर्षी खर्ची पडणार नसल्याने हा निधी वीज देयकांसाठी वर्ग करून द्यावा, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सुमारे सात ते आठ वेळा पत्र दिले असल्याचे वृत्त आहे. परंतु लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे यांनी त्यावर कार्यवाही केलेली नाही. विद्यमान आयुक्तांनादेखील शिक्षण मंडळाचे सादरीकरण करताना याबाबत अवगत केल्याचे समजते. परंतु त्यानंतर अद्याप कार्यवाही न झाल्याने अखेरीस शाळांची वीज महावितरणने खंडित केला आहे.